कोल्लम (केरळ) - बीएएमएसची विद्यार्थिनी विस्मया हिचा हुंड्यासाठी छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पती किरणकुमारला न्यायालयाने 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच साडेबारा लाख रुपयांचा दंडी ठोठावला आहे. त्यातील दोन लाख रुपये विस्मयाच्या पालकांना देण्याचे आदेशही दिले आहेत.
पोलिसांनी सादर केले पाचशे पानी आरोपपत्र - केरळ पोलिसांनी आपल्या 500 पानांच्या आरोपपत्रात हुंड्यासाठी झालेल्या छळामुळे विस्मयाने आत्महत्या केल्याचे म्हटले होते. विस्मया (वय 22 वर्षे) ही 21 जून, 2021 रोजी कोल्लम जिल्ह्यातील सस्थमकोट्टा येथे तिच्या पतीच्या घरात मृतावस्थेत आढळूली होती. घटनेच्या एक दिवसापूर्वी कुमारने हुंड्यासाठी छळ केल्याबद्दल विस्मयाने तिच्या नातेवाईकांना व्हॉट्सअॅप मेसेज पाठवले होते. तसेच तिच्या शरीरावर जखमा आणि मारहाणीच्या खुणांचे फोटोही पाठवले होते.
इतका दिला होता हुंडा - तिच्या वडिलांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीनुसार, किरणला हुंडा म्हणून शंभर सोन्याची नाणी (एक नाणी आठ ग्रॅमची), एक एकराहून अधिक जमीन व दहा लाख रुपयांची कार हुंडा म्हणून 2020 मध्ये झालेल्या लग्नात दिली होती.
असा झाला युक्तीवाद - न्यायालयाने या प्रकरणात आत्महत्या न समजता हुंड्यासाठी हत्या केल्याचे मान्य करावे व आरोपीवर कोणतीही दयामया दाखवू नये, असा युक्तीवाद सराकरी पक्षाच्या वतीने न्यायालयात करण्यात आला. दोन्ही पक्षाचे युक्तीवाद झाल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणात हुंड्यासाठी छळ व आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत किरणकुमारला दोषी ठरवले. दहा वर्षांचा तुरुंगवास व साडेबारा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंडातील दोन लाख रुपये विस्मयाच्या आई वडिलांना द्यावा, असेही आदेश न्यायालयाने दिले आहे. त्याचबरोबर या निकालातून समाजाने बोध घ्यावा, असेही न्यायालयाने सांगितले.
निकालाबाबत समाधान - विस्मयाच्या पालकांनी या निकालाबाबत समाधान व्यक्त केले. पण, अपक्षेपेक्षा कमी शिक्षा झाल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर तपास पथकाचे आभार मानत हुंडा मागणाऱ्यांनी या निकालाकडे लक्ष द्यावे, असे आश्वासनही केले आहे.
शासकीय सेवेतून बडतर्फ - किरणकुमार हा परिवहन विभागात सहायक मोटार वाहन निरीक्षक म्हणून कर्तव्य बजावत होता. पण, या प्रकरणात गुन्हा दाखल होताच राज्याचे परिवहन मंत्री अँटनी राजू यांनी किरणकुमारला सेवेतून बडतर्फ केले आहे.
हेही वाचा - टाइम मॅग्झिनच्या 100 प्रभावशील व्यक्तींच्या यादीत तुरुंगात असलेल्या खुर्रम परवेझला स्थान