पणजी : गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांचा जन्म 14 जून 1970 रोजी झाला. ते सध्या फातोर्डा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांचा जन्म ब्युनोस आयर्स, अर्जेंटिना येथे जयवंत आणि लक्ष्मीबाई सरदेसाई यांच्या पोटी झाला. त्यांचे वडील जयवंत हे कीटकशास्त्रज्ञ होते. ज्यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये सेवा केली होती. सविता केरकर आणि कै.माधवी सरदेसाई ही त्यांची भावंडं आहेत. सरदेसाई यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून १९९२ मध्ये कृषी विषयात विज्ञान शाखेची पदवी मिळवली आणि ते व्यवसायाने रिअल इस्टेट व्यापारी आहेत. विजय यांनी उषा सरदेसाई यांच्याशी लग्न केले आणि त्यांना उर्वी नावाची मुलगी आहे.
सरदेसाई हे प्रोग्रेसिव्ह गोवा रेसलिंग असोसिएशन आणि गोवा डॉजबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. सरदेसाई यांनी मृत्यूनंतर नेत्रदान करण्याचा संकल्प केला आहे.विजय यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात गोव्याच्या विद्यार्थी राजकारणातून केली. ते गोवा विद्यापीठ विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांनी राजकीय कारकिर्दीला काँग्रेसमधून सुरुवात केली आणि ते गोवा प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. सरदेसाई यांची मडगाव नगरपरिषदेचे नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
2012 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत विजय सरदेसाई यांना फातोर्डा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी काँग्रेस सोडली आणि अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा लढवली आणि विजयी झाले. अपक्ष आमदार म्हणून पदार्पण करताना ते प्रखर विरोधी नेतृत्व म्हणून उदयास आले. गोवा विधानसभेच्या सभागृहात आणि विधानसभेच्या बाहेरही त्यांनी केलेल्या कामगिरी मुळे ते लोकप्रिय झाले. सरदेसाई यांनी 2015 मधे मडगाव नगरपरिषद निवडणुकीत पॅनेल उभे केले होते जे जिंकले होते. सरदेसाई यांच्यावर विरोधकांनी लुई बर्जर लाचखोरी घोटाळ्यात सहभागी असल्याचे आरोप केले होते परंतु हे आरोप सिद्ध झाले नाहीत.
25 जानेवारी 2016 रोजी त्यांनी गोवा फॉरवर्ड पार्टी सुरू केली. ते पक्षाचे मार्गदर्शक असले तरी पक्षांतरविरोधी कायद्यामुळे ते अधिकृतपणे पक्षात सामील झाले नव्हते. त्यांनी 16 जानेवारी 2017 रोजी पक्षात अधिकृत प्रवेश केला आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे उमेदवार म्हणून 2017 ची विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत पक्षाने केवळ चार मतदारसंघात निवडणूक लढवली आणि तीनमध्ये विजय मिळवला.
2017 च्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला 21 जागांचे अपेक्षित बहुमत मिळाले नाही, परंतु कॉंग्रेस 17 जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. सरदेसाई आणि गोवा फॉरवर्ड पक्षाच्या इतर दोन आमदारांनी 13 जागा मिळविणाऱ्या भाजपला पाठिंबा दिला, मनोहर पर्रीकर यांची गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली जाईल या अटीवर त्यांनी हा पाठिंबा दिला होता. सरदेसाई यांची कारकिर्द भाजपविरोधी तत्त्वावर आधारित होती, तरी त्यांनी भाजपला पाठिंबा दिल्यामुळे त्यांच्या समर्थकांसह अनेकांनी टीका केली होती. गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष प्रभाकर टिंबळे यांनी गोव्यात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापनेला पाठिंबा दिल्यामुळे पक्षाला रामराम ठोकला होता.
गोव्यातील भाजप हा राष्ट्रीय भाजपपेक्षा वेगळा आहे आणि सरकार समान किमान कार्यक्रमानुसार काम करेल, असे त्यांनी नमूद केले होते की, सरदेसाई यांनी दावा केला होता की ते सरकारमध्ये वॉचडॉग म्हणून काम करतील आणि त्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारला स्थिरता आणि विकासासाठी पाठिंबा दिला आहे. विजय सरदेसाई यांनी 14 मार्च 2017 रोजी मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील गोवा सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली होती त्याचवेळीा गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार, विनोदा पालिनेकर आणि जयेश साळगावकर यांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली होती.