पणजी - केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रकृतीची चौकशी उपराष्ट्रपती वैकय्या नायडू यांनी आज (शुक्रवार) गोव्यात जाऊन केली. रस्ते अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांच्यावर गोवा मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, आता त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
उपराष्ट्रपतींनी ट्विट करून दिली माहिती -
श्रीपाद नाईक यांची भेट घेतल्याची माहिती उपराष्ट्रपतींनी ट्विट करून दिली. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशीही उपराष्ट्रपतींनी चर्चा केली. नाईक यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी त्यांना सांगितले. कर्नाटकात रस्ता अपघातात गंभीर जखमी झालेले केंद्रीय आयुष आणि संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्यावर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात (गोमेकॉ) उपचार सुरू आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत त्यांच्या उपचारांची माहिती घेत आहेत. तसेच केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही गोव्यात जाऊन भेट घेतली.
देवदर्शनाला जाताना झाला अपघात
केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक हे सपत्नीक देवदर्शनासाठी जात असताना उत्तर कर्नाटकातील येल्लापूर येथे त्यांच्या कारला अपघात झाला. यामध्ये त्यांच्या पत्नी विजया नाईक आणि स्वीय सहाय्यक यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य चारजण जखमी झाले. यामध्ये नाईक यांचाही समावेश असून ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना यल्लापूर येथून विशेष रुग्णवाहिकेद्वारे गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात आणण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह मंत्री, भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच रुग्णालय परिसरात समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. गोमेकॉ परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
हाडांची शस्त्रक्रिया करण्यात आली -
नाईक यांच्यावर हाडांच्या चार शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तसेच त्यांची तब्येत स्थिर आहे. ते अतिदक्षता विभागात असून गोमेकॉच्या हृदयविकार विभागाच्या तज्ज्ञांचा चमू त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. त्यांनी जर बाहेरील तज्ज्ञाला बोलावण्याची शिफारस केली तर त्यांना येथेच बोलावण्यात येईल, असे मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले आहे.
अपघातानंतर नाईक यांना कर्नाटकातून गोव्यात आणले जात होते तेव्हा त्यांची प्रकृती नाजूक झाली होती. रक्तदाब 60 इतका खाली आला होता. आम्ही त्यांना तत्काळ बूस्ट देत तो 100 पर्यंत नेला आणि गोमेकॉत येताच रक्तही चढवले. त्यानंतर रात्री दोन वाजता शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली, जी सकाळी साडेसात वाजता संपली. त्यानंतर नाईक यांनी प्रतिसाद दिला. आता त्यांना चालण्या फिरण्यास त्रास होणार नाही. तसेच रक्तस्राव होणार नाही. दक्षता म्हणून यांना अतिदक्षता विभागात वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. असे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.