नवी दिल्ली - महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी 16 मार्च रोजी संपली. दोन्ही बाजू कोर्टाने ऐकून घेतल्या. त्यानंतर याबाबतचा निकाल घटनापीठाने राखून ठेवला आहे. या खटल्याची सुनावणी 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे झाली. त्यामध्ये सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्याबरोबर न्यायमूर्ती एम आर शाह, न्यायमूर्ती कृष्णमुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली, आणि न्यायमूर्ती पी. एस नरसिंह यांचा समावेश आहे. यातील न्यायमूर्ती शाह हे येत्या 15 मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल त्यांच्या सेवानिवृत्तीपूर्वीच लागेल असा अंदाज आहे. त्यामुळेच कदाचित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी येत्या 15-20 दिवसात सरकार कोसळेल अशाप्रकारचे वक्तव्य नुकतेच केले होते.
सुप्रीम कोर्टामध्ये पाच न्यायमूर्तींच्यापुढे हे प्रकरण पूर्णपणे सुनावणी झालेली आहे. त्यातील एक न्यायमूर्ती निवृत्त होत असल्याने तत्पूर्वीच हा निकाल लागेल अशी शक्यता असल्याने राजकीय घडामोडींनाही वेग आल्याचे दिसते. गेल्या काही दिवसांपासून तेच होताना दिसत आहे. विरोधीपक्षनेते अजित पवार राष्ट्रवादीचे काही आमदार घेऊन राज्य सरकारला पाठिंबा देतील, अशा प्रकारच्या बातम्या आल्या. मात्र त्यावर स्वतः अजित पवार यांनीच स्पष्टीकरण देऊन आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र अजित पवार यांनी पत्र तयार केल्याचा दावाही काही माध्यमांनी केला होता. राष्ट्रवादीच्या 53 पैकी 40 आमदारांचा पाठिंबा घेऊन अजित पवार बाहेर पडणार असे मानण्यात येत होते. याप्रकारच्या वृत्तांमुळे राजकीय वर्तुळात मात्र वातावरण चांगलेच तापले होते.
याचदरम्यान उद्धव ठाकरे यांनी माध्यमांना सांगितले की भाजपच्या विरोधात ते एकटे लढण्यास समर्थ आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे काय असा प्रश्न उपस्थित केला गेला. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीही अदानींच्या मुद्यावर त्यांना टारगेट केले जात आहे, अशी गुगली टाकली. एवढेच नाही तर वेळकाढूपणासाठी संयुक्त संसदीय समिती असते, असे सांगून या प्रकरणात त्याची काही गरज नसल्याचेही पवार यांनी म्हटले होते. त्यामुळे त्यांनी भाजपशी जवळीक वाढल्याच्या चर्चांना ऊत आला. अजित पवार नॉट रिचेबल होऊन त्यांनी पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले. राष्ट्रवादीचे 20 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याच्याही वावड्या उठल्या होत्या. त्यामुळे विविध राजकीय चर्चांना उधाणा आले होते.
नुकतेच शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे गटाचे 13 आमदार संपर्कात असल्याचे मोठे विधान केले आहे. नुकतेच राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे राजकीय भूकंप होईल असे वक्तव्य केले होते. अशा परिस्थितीत राज्यात राजकीय परिस्थिती अत्यंत तापल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता सगळ्यांचे लक्ष सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे लागले आहे. त्यामध्ये काय लपलंय, ते बाहेर आल्यानंरतच या बातम्यांमध्ये असलेल्या चर्चा आणि वक्तव्यांपैकी किती खरी आणि किती खोटी ये समोर येईल. जर न्यायमूर्ती शाह यांच्या निवृतीपूर्वी निकाल येईल असे मानले तर येत्या 15 मेपूर्वी राज्यातील राजकीय परिस्थिती नेमके कोणते वळण घेईल ते स्पष्ट होईल.