तिरूवनंतपूरम - काँग्रेसकडून केरळमधील विधानसभेत नवे विरोधी पक्षनेते म्हणून पाच वेळा आमदार झालेले व्ही.डी. सतीशन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सतीशन यांच्या 57 व्या वाढदिवसाच्या 10 दिवस शनिवारी काँग्रेसकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षाच्या निर्णयाची घोषणा केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीचे (केपीसीसी) अध्यक्ष मुल्लाप्पल्ली रामचंद्रन यांनी केली. व्ही.डी. सतीशन हे रमेश चेन्नीथला यांची जागा घेतील. चेन्नीथला हे अलाप्पुझा जिल्ह्यातील हरीपद मतदारसंघातून पुन्हा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
दोन वेळा काँग्रेसचे मुख्यमंत्री राहिलेले ओमन चांडी आणि विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथाला यांच्या नेतृत्वात गेल्या काही वर्षांत केरळमधील काँग्रेस पक्ष राहिला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतील परभावानंतर नेतृत्व बदलण्याची मागणी होत होती.
सर्व राजकीय पक्ष बदलले पाहिजेत. बदल हा नैसर्गिक आहे. मला सर्व वर्गांकडून पूर्ण सहकार्याची अपेक्षा आहे. धर्मनिरपेक्षता कायम राखणे आणि विरोधी पक्षनेते म्हणून काम करणे हे माझे प्राथमिक उद्दीष्ट आहे, अशी प्रतिक्रिया सतीशन यांनी दिली. सतीशन हे पाच वेळा आमदार राहिले आहेत. 2001 पासून ते परवूर मतदारसंघातून जिंकत आले आहेत. 1996 मध्ये पहिल्या प्रयत्नात त्यांना पराभव पत्कारावाला लागला होता.
केरळ विधानसभा निवडणूक -
केरळ विधानसभेत 140 जागांसाठी 6 एप्रिल 2021 मतदान पार पडले. राज्याची ही 15 वी विधानसभा निवडणूक होती. तर 2 मेला निकाल जाहीर झाला. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी)च्या नेतृत्त्वाखाली लेफ्ट डेमॉक्रॅटिक फ्रंट (एलडीएफ)ने केरळमध्ये इतिहास रचला आहे. गेल्या चाळीस वर्षांमध्ये पहिल्यांदाच केरळमध्ये एका सरकारला जनतेने पुन्हा निवडून दिलं आहे. केरळात काँग्रेसचा पराभव झाला. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी केरळमधून खासदार आहेत. त्यांनी केरळमध्ये प्रचाराचा धुरळा उडवला होता. मात्र, काँग्रेसला सर्वसामान्यांपर्यंत पोहचण्यात अपयश आले.