वासुदेव यांचे मूळ घराणे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी येथील आहे. वासुदेव यांचे आजोबा अनंतराव फडके हे कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. हा किल्ला १८१८ मध्ये इंग्रजांच्या स्वाधीन करण्याआधी त्यांनी दोन ते तीन दिवस इंग्रजांशी लढा दिला. कर्नाळा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेल्यानंतर पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्यातील शिरढोण (रायगड) गावी फडके कुटुंब वास्तव्य आले. अनंतराव यांचे पुत्र बळवंतराव यांना शिरधोणमध्ये 4 नोव्हेंबर 1845 रोजी पुत्ररत्न प्राप्ती झाली. हेच वासुदेव बळवंत फडके. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील पहिले क्रांतिकारक असलेल्या वासुदेव बळवंत फडके यांचं 17 फेब्रुवारी 1883 रोजी निधन झाले. महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवर जन्मलेले वासुदेव बळवंत फडके हे एका अत्यंत सामान्य कुटुंबातील होते.
पुणे हीच कर्मभूमी : वासुदेव यांचे प्राथमिक शिक्षण शिरढोण येथे झाले. १८५५–६० या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये वासुदवे यांचे माध्यमिक शिक्षण कल्याण, मुंबई, पुणे या तीन ठिकाणी झाले. वासुदेव यांनी पाचवीनंतर इंग्रजीचे शिक्षण सोडले आणि नोकरीला सुरुवात केली. वासुदेव यांनी पहिली नोकरी जी. आय्. पी. रेल्वेमध्ये केली. वरिष्ठ इंग्रज अधिकाऱ्यांपुढे उगाच विनम्र होण्याची सवय त्यांना नसल्याने रेल्वेमधली नोकरी लगेच सुटली. त्यानंतर ग्रँट मेडिकल कॉलेजमधील लेखनिकाची नोकरीही याच स्वभावामुळे फार दिवस टिकली नाही. अखेर १८६३ साली वासुदेव लष्कराच्या हिशेबी खात्यात नोकरीला लागले. पुढील १६ वर्षे म्हणजेच २१ फेब्रुवारी १८७९ पर्यंत ते तिथेच कामाला होते. २१ फेब्रुवारी १८७९ रोजी त्यांनी लष्कारविरोधात बंड पुकारले. १८६५ साली त्यांची मुंबईहून पुण्यात बदली झाली. पुढे पुणे हीच त्यांची कर्मभूमी ठरली.
क्रांतिकारक गटाची स्थापना : ब्रिटीश राजवटी दरम्यान फडके हे शेतकरी समाजाच्या दुर्दशाने निराश झाले होते. त्यांचा असा विश्वास होता की ‘स्वराज्य’ हाच यावरील उपाय आहे. भारताला स्वराज्य मिळावे, याकरिता राजकीय प्रचारासाठी दौरा करणारे ते पहिले भारतीय होते. 1875 मध्ये त्यांनी ब्रिटीशांचा पाडाव करण्यासाठी महाराष्ट्रातील कोळी, भिल्ल आणि धनगर समाजाच्या मदतीने रामोशी नावाच्या एक क्रांतिकारक गटाची स्थापन केली. 20 फेब्रुवारी 1879 रोजी फडके यांनी आपले सहकारी विष्णू गद्रे, गोपाळ साठे, गणेश देवधर आणि गोपाळ हरी कर्वे यांच्यासह पुण्यापासून आठ मैलांच्या उत्तरेला असणाऱ्या लोणी गावाबाहेर 200 तरूणांचं बलवान सैन्य दलाची स्थापना केली. बहुधा ही भारताची पहिली क्रांतिकारक सेना होती. त्यांच्या सशस्त्र संघर्षासाठी निधी गोळा करण्यासाठी आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी फडके आणि त्यांच्या साथीदारांनी एका श्रीमंत इंग्रजी व्यावसायिकावर छापा टाकला होता.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापणा : मे 1879 मध्ये त्यांनी सरकारच्या शोषणात्मक आर्थिक धोरणांचा निषेध करीत यांनी आपलं प्रसिद्ध घोषणापत्र जारी केली आणि ब्रिटीश सरकारला चेतावणी दिली. या घोषणेच्या प्रती राज्यपाल, जिल्हाधिकारी आणि अन्य सरकारी अधिकाऱ्यांना पाठविल्या गेल्या आणि देशभरात एकच खळबळ उडाली. फडके यांनी एकदा ब्रिटीश सैनिकांवर केलेल्या हल्ल्यानंतर काही दिवस संपूर्ण पुणे शहराचा ताबा मिळवला होता. या घटनेमुळे ब्रिटीशांना त्यांच्या ताकदीची जाण होऊन, वासुदेव बळवंत फडके म्हणजे नक्की कोण, हे त्यांना कळालं. 1860 मध्ये फडके, लक्ष्मण नरहर इंदापूरकर आणि वामन प्रभाकर भावे या तीन समाज सुधारक आणि क्रांतिकारकांनी पूना नेटिव्ह संस्था स्थापन केली, जी सध्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी म्हणून ओळखली जाते.
अडेन तुरुंगात रवानगी : नंतर जेव्हा इंग्रजांनी देशावर त्यांची पकड घट्ट केली तेव्हा त्यांना महाराष्ट्र सोडून जावे लागले. ते आंध्र प्रदेशच्या कुर्नूल जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग श्रीशैला मल्लिकार्जुनच्या मंदिरात गेले. ब्रिटिश सरकारची कार्यालये असलेल्या पुण्यातील दोन पेशवे वाड्यांना फडके यांनी आग लावली तेव्हापासून ब्रिटीश फडकेंवर छापा टाकत होते. 1879 मध्ये फडके यांना ताब्यात घेण्यात ब्रिटीशांना यश आलं आणि त्यांना मेनमधील अडेन येथील तुरुंगात हलवलं गेलं, कारण ब्रिटिशांना त्यांच्या अटकेबाबत भारतीय लोकांच्या प्रतिक्रियेची भीती वाटत होती.
कारावासातच आले मरण : न्यायमुर्ती न्यूनहॅम यांनी वासुदेव यांना जन्मठेपेची काळ्या पाण्याची शिक्षा फर्मावली. पुढे त्यांची रवानगी १८८०च्या जानेवारीत एडनच्या तुरुंगात झाली. तेथून आत्महत्या करण्याचा व पळून जाण्याचा वासुदेव यांचा प्रयत्न फसला. तुरुंगातील हाल, एडनची उष्ण हवा यांमुळे त्यांची प्रकृती बिघडली आणि क्षयरोगाने त्यांना पछाडले. त्यातच अखेरीस त्यांनी अन्नग्रहण सोडले. ते १७ फेब्रुवारी १८८३ रोजी एडन येथील कारावासातच मरण पावले. त्यांचं निधन झालं तेव्हा ते अवघ्या 38 वर्षांचे होते. वासुदेव यांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या सशस्त्र उठावाची चळवळ विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात देशभरात पसरली. याच कारणामुळे वासुदेव यांना ‘लढाऊ राष्ट्रवादाचे जनक’ असं म्हणतात. त्यांच्या कार्याचा उचित गौरव करण्यासाठी शिरढोण या त्यांच्या जन्मगावी त्यांचा स्मारकस्तंभ उभारून करण्यात आला.