देहराडून : कैलास मानसरोवर यात्रा सलग चार वर्षापासून स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे उत्तराखंड पर्यटन विभाग भाविकांना जुन्या लिपुलेख शिखरावरून कैलास पर्वताची झलक दाखवण्याचा नवा मार्ग शोधत आहेत. जुने लिपुलेख शिखर हे तिबेटचे प्रवेशद्वार असलेल्या लिपुलेख खिंडीच्या पश्चिमेला आहे. कैलास मानसरोवर यात्रा लिपुलेख पास मार्गे शेवटची 2019 मध्ये आयोजित करण्यात आली होती. 2020 मध्ये कोविड-19 साथीच्या आजारामुळे ती स्थगित करण्यात आली होती. तेव्हापासून ती सतत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे कैलास मानसरोवर यात्रेचा नवा मार्ग शोधत असल्याची माहिती उत्तराखंड पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली.
जुन्या लिपुलेख शिखरावरून कैलास दर्शन : अलीकडेच पर्यटन विभागाचे अधिकारी, जिल्हा अधिकारी, साहसी पर्यटन तज्ज्ञ आणि सीमा रस्ते संघटनेच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने जुन्या लिपुलेख शिखराला भेट दिली. येथून भव्य कैलास पर्वत दिसतो. त्यामुळे हे ठिकाण धार्मिक पर्यटन म्हणून कसे विकसित करता येईल याचा शोध घेता येईल, अशी माहिती धारचुलाचे उपविभागीय दंडाधिकारी देवेश शशानी यांनी वृत्तसंस्थेला दिली. देवेश शशानी देखील त्या टीमचा एक भाग होते. जुन्या लिपुलेख शिखरावरून कैलास दर्शन हा कैलास मानसरोवर यात्रेचा पर्याय असू शकतो, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
केला जाऊ शकतो स्नो स्कूटरचा वापर : आमच्या टीमला व्यास खोऱ्यातील धार्मिक पर्यटनाच्या शक्यतेचा अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यासाठी आम्ही जुने लिपुलेख शिखर, नाभिधंग आणि आदि कैलासला भेट दिल्याची माहिती जिल्हा पर्यटन अधिकारी कृती चंद यांनी दिली. स्नो स्कूटर यात्रेकरूंना समुद्रसपाटीपासून 19 हजार फूट उंचीवर आणि लिपुलेख खिंडीपासून 1800 मीटर अंतरावर असलेल्या शिखरावर घेऊन जाऊ शकते. बीआरओने शिखराच्या पायथ्यापर्यंत रस्ता तयार केल्याची माहितीही कृती चंद यांनी यावेळी दिली.
शिखरावर जाण्याच्या मार्गात आव्हान : यापूर्वीही वृद्धत्वामुळे किंवा आरोग्याच्या समस्यांमुळे मानसरोवरला जाऊ न शकलेल्या यात्रेकरूंना जुन्या लिपुलेख शिखरावरून पवित्र कैलास पर्वताचे 'दर्शन' मिळत असल्याची माहिती व्यास खोऱ्यातील रहिवाशांनी दिली. शिखराला भेट देणारे व्यास व्हॅलीच्या रोंगकाँग गावचे रहिवासी भूपाल सिंह रोंकली यांनी शिखरावरून कैलास पर्वताचे सुंदर आणि रोमहर्षक दृश्य दिसत असल्याचे सांगितले. जोरदार वारे आणि चार टर्निंग पॉइंट्स हे शिखरावर जाण्याच्या मार्गातील एकमेव आव्हान असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तेथून अनेकवेळा कैलास पर्वताचे व्हिडिओ शूट करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.