डेहराडून - उत्तराखंडमध्ये नेतृत्व बदलाचे वारे पुन्हा वाहत आहेत. मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांच्या अचानक दिल्ली भेटीनंतर राजकीय वातावरण तापले आहे. अशा परिस्थितीत उत्तराखंडला येत्या काही दिवसांत नवीन मुख्यमंत्री मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भाजपा उच्च कमांडने पुन्हा एकदा उत्तराखंडमधील नेतृत्व बदलण्याचे ठरवले आहे. तर राज्याची कमान कोणाच्या हाती सोपविली जाईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
गेल्या 5 मे रोजी भारतीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक घेण्यास नकार दिला होता. निवडणूक आयोगाने कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा हवाला दिला होता. तेव्हापासून मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांना 9सप्टेंबरच्या आधी विधानसभेचे सदस्य होणे गरजेचे आहे. मात्र, निवडणूक लढवल्याशिवास ते शक्य नाही. अशा परिस्थितीत नेतृत्व बदलणे हाच मुख्यतः एकमेव पर्याय उरतो. या पार्श्वभूमीवर त्यांच्या दिल्ली दौऱ्याने राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.
मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी 10 मार्च रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि ते लोकसभेचे खासदारही आहेत. अशा परिस्थितीत तीरथसिंग रावत यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर 6 महिन्यांच्या आत विधानसभेचे सदस्यत्व घ्यावे लागेल. म्हणजेच त्यांना कोणत्याही विधानसभा जागेवरून पोटनिवडणूक जिंकावी लागेल. मात्र, निवडणूक आयोगनुसार एखाद्या राज्यातील आगामी विधानसभा निवडणूकीसाठी एक वर्ष किंवा त्याहून अधिक वेळ शिल्लक राहिल्यास तेथे पोटनिवडणूक घेता येत नाही. अशा परिस्थितीत राज्यातील रिक्त जागांवर नजर टाकली तर गंगोत्री, हल्द्वानी विधानसभा जागा सध्या रिक्त आहेत. परंतु कोरोना परिस्थितीत या जागांवर पोटनिवडणूक घेणे अवघड दिसत आहे. त्यामुळे नेतृत्व बदलणे हा भाजपा हाय कमांडकडे एकच पर्याय उरला आहे.
सर्व समीकरणे लक्षात घेता उत्तराखंड राज्यात पुन्हा एकदा नेतृत्व बदलण्याचा निर्णय उच्च कमांडने घेतला आहे. राज्यात आता नेतृत्वात बदल झाला नाही. तर मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांना 9 सप्टेंबर रोजी 6 महिन्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर स्वत: राजीनामा द्यावा लागेल. अशा स्थितीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी केवळ 3 महिने शिल्लक राहतील.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उच्च कमांडने मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांना येत्या काही दिवसांत राजीनामा देण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्री तीरथसिंग रावत शुक्रवारी डेहराडूनला परततील, अशी अपेक्षा आहे. यानंतच्या, पुढच्या 2 दिवसांत उत्तराखंडच्या राजकारणात काहीही मोठे बदल घडू शकतात. मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांनी राजीनामा दिला तर राज्याचे पुढचे प्रमुख कोण असतील, हा मोठा प्रश्न निर्माण होते. ही राज्यातील परिस्थिती येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.
वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत -
गेल्या मार्च महिन्यात भाजपाकडून मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांची गच्छंती करण्यात आली होती आणि उत्तराखंडची कमान तीरथसिंह रावत यांच्या हाती सोपवण्यात आली होती. तीरथसिंह रावत सत्ता हाती घेताच चर्चेत आले होते. महिलांनी फाटक्या जीन्स घालण्यावरून केलेल्या वक्तव्यामुळे टिकेचे धनी झाले होते. तसेच अमेरिकेने भारतावर 200 वर्ष राज्य केल्याचाही त्यांनी जावई शोध लावला होता. तर हरिद्वार येथे एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना भगवान कृष्ण आणि राम यांच्याशी केली. एक दिवस लोक पंतप्रधान मोदींची पूजा करतील, असेही तीरथसिंग रावत म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर कडक टीका झाली होती.
उत्तराखंडमध्ये गेल्या 21 वर्षात 9 मुख्यमंत्री -
उत्तराखंड हे भारताच्या उत्तरेकडील एक महत्त्वाचे राज्य आहे. या राज्याला देवभूमी या नावाने सुद्धा ओळखले जाते. भाजपाकडून मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांची गच्छंती करण्यात आली असून उत्तराखंडची कमान आता तीरथ सिंह रावत यांच्या हाती सोपवण्यात आली आहे. राज्याची निर्मिती झाल्यापासून गेल्या 21 वर्षांत फक्त एकाच मुख्यमंत्र्याने आपला कार्यकाळ पूर्ण केला. उत्तर प्रदेशमधून विभाजन झाल्यावर 9 नोव्हेंबर 2000 साली उत्तराखंड राज्याची निर्मिती झाली आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री हे नित्यानंद स्वामी होते. राज्याची निर्मिती झाल्यापासून गेल्या 21 वर्षांत फक्त एकाच मुख्यमंत्र्याने आपला कार्यकाळ पूर्ण केला.
उत्तरांखड विधानसभा संख्याबळ -
70 सदस्यसंख्या असलेल्या उत्तराखंड विधानसभेत भाजपने 57 जागांवर विजय मिळवत काँग्रेसकडून सत्ता खेचून आणली. काँग्रेसला केवळ 11 जागांवर समाधान मानावं लागलं. आता आगामी विधानसभा निवडणूक 2022 मध्ये होईल. राज्यात सत्तेत येण्यासाठी 21 जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे.
हेही वाचा - अमेरिकेने भारतावर 200 वर्ष राज्य केलं; तीरथसिंह रावत यांचा जावई शोध
हेही वाचा - रिप्ड जीन्स प्रकरण : मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्या विधानावर राज्यातील तरुणांची प्रतिक्रिया