नवी दिल्ली - पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राष्ट्रीय राजधानीत भेट घेतली. पंतप्रधानांच्या भेटीनंतर दोन दिवसांच्या दिल्ली दौर्यावर असलेले आदित्यनाथ हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेणार आहेत.
गुरुवारी आदित्यनाथ राष्ट्रीय राजधानीत दाखल झाले आणि त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची निवासस्थानी भेट घेतली. 2022 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात भाजपाचे सरकार लवकरच मंत्रिमंडळात फेरबदल करणार असा अंदाज वर्तविला जात आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका 2022 मध्ये होणार आहेत. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने 300 हून अधिक जागांवर विजय मिळविला. 403 सदस्य असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभेमध्ये प्रमुख पक्षांमध्ये भाजपाचे 309, समाजवादी पार्टीचे 49, बहुजन समाजवादी पक्षाचे 18 आणि काँग्रेसचे 7 सदस्य आहेत.
राज्यातील भाजपा संघटनेतील तसेच मंत्रिमंडळातील बदल लक्षात घेता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची दिल्ली भेट ही अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय अरविंद शर्मा आणि काँग्रेस सोडून भाजपामध्ये गेलेल्या जितिन प्रसाद यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येईल.