लखनऊ : उत्तर प्रदेशच्या दहशतवादी विरोधी पथकाने कारवाई करत शुक्रवारी एका निवृत्त सैनिकाला अटक केली. हेरगिरी करुन गोपनीय माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला पाठवल्याच्या आरोपाखाली या सैनिकावर कारवाई करण्यात आली आहे.
लष्करी गुप्तचर विभागाच्या टिपनंतर कारवाई..
लखनऊच्या लष्करी गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार एटीएसने ही कारवाई केली. सौरभ शर्मा या सैनिकाने जून २०२०मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. यानंतर त्याने अत्यंत गोपनीय अशी माहिती टेक्स्ट, ऑडिओ आणि फोटोंच्या माध्यमातून पाकिस्तानला दिली होती. कित्येक वेळा त्याने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांशी व्हॉट्सअप कॉलवरही बोलणी केल्याचे एका एटीएस अधिकाऱ्याने सांगितले.
चार वर्षांपासून देत होता पाकिस्तानला माहिती..
लष्करी गुप्तचर विभागाकडून माहिती मिळाल्यानंतर, या 'ऑपरेशन क्रॉस कनेक्शन'ला सुरुवात करण्यात आली. यानंतर केलेल्या तपासात असे समोर आले, की गेल्या चार वर्षांपासून हा सैनिक पाकिस्तानला माहिती पुरवत होता. या सैनिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा : 'एअर इंडिया'च्या महिला वैमानिक रचणार इतिहास; उत्तर ध्रुवावरुन करणार उड्डाण