नवी दिल्ली - हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. ब्रिटनच्या गृहमंत्र्यांनी फरार हिरे व्यापारी नीरव मोदीच्या प्रत्यर्पणाला हिरवा कंदील दाखवला आहे. पंजाब नॅशनल बँकेला सुमारे 12 हजार कोटींचा चुना लावून सध्या लंडनमध्ये राहत असलेला हा मोदी यातून वाचण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे.
नीरव मोदीच्या प्रत्यर्पणाला २५ फेब्रुवारीला तेथील न्यायालयाने परवानगी दिली होती. त्यानंतर ब्रिटनच्या गृहमंत्र्यांनी त्याबाबत परवानगी देणे आवश्यक होते. प्रत्यर्पणाला गृहमंत्री प्रीती पटेल यांनी मंजुरी दिली आहे. नीरव मोदीला लंडनमध्ये 19 मार्च 2019 रोजी अटक करण्यात आली होती. पीएनबीमधील घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) त्याची चौकशी करत आहे आणि मनी लॉन्ड्रिंगच्या संदर्भात सक्तवसुली संचलनालय (ईडी) चौकशी करत आहे.
पंजाब नॅशनल बँकेतील काही अधिकाऱ्यांच्या मदतीने तब्बल 12 हजार 600 कोटी रुपयांचा घोटाळा करून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीला भारतात पाठवले जाईल, हे अलीकडेच नक्की झाले होते. ब्रिटनच्या न्यायालयामध्ये प्रत्यर्पण खटल्यात मोदीच्या हाती अपयश आले होते. त्याच्यावरील आर्थिक घोटाळा आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपात तथ्य आहे, असेही न्यायालयाने म्हटले होते.
हेही वाचा - उद्या यांना दोन वेळचं जेवण लागलं, तरी केंद्राकडे मागतील, नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका
हेही वाचा - राज ठाकरेंनी मानले पंतप्रधानांचे आभार, म्हणाले- एकत्रित संकटावर मात करता येईल