राजकोट - दिवसा वीज उपलब्ध नसल्याने हाडे गोठवणाऱ्या थंडीत शेतकऱ्यांना रात्री काम करावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दिवसा वीज देण्याची मागणी वीज विभागाकडे केली आहे. मात्र वीज विभागाने शेतकऱ्यांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्याने शेतकऱ्यांनी अनोखे आंदोलन केले. दिवसा वीज न दिल्याने शेतकऱ्यांनी वीजेची प्रतिकात्मक अंतयात्रा काढत अनोखे आंदोलन केले. हे आंदोलन राजकोटमधील उपलेटा पंथक या गावातील शेतकऱ्यांनी केले. शेतकऱ्यांच्या या अनोख्या आंदोलनाने मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे.
शेतकऱ्यांना करावा लागतो थंडीचा सामना : उपलेटा पंथक येथील शेतकऱ्यांना रात्री वीज मिळाल्याने खूप अडचणी येत आहेत. शासनाने रात्री ऐवजी दिवसा वीज द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. रात्री वीज मिळत असल्याने शेतकऱ्यांना हाडे गोठवणाऱ्या थंडीत काम करावे लागते. रात्रीही वन्य प्राण्यांच्या भीतीने काम करावे लागत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. रात्री हिंस्त्र प्राण्याचा वावर असल्याने शेतकऱ्यांना जीव मुठीत धरुन काम करावे लागत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी ईटीव्ही भारतकडे दिली.
शेतात काम करताना अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू : उपलेटा पंथक गावातील शेतकऱ्यांना फक्त रात्रीच वीज दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना कडाक्याच्या थंडीत रात्री शेतात काम करावे लागते दिवसेंदिवस वाढत्या थंडीमुळे जीवघेणी सर्दी आणि इतर अनेक समस्यांनी शरीर सुन्न होत आहे. सध्या थंडीत शेतात काम करताना अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. मुलांना थंडीपासून वाचवण्यासाठी यंत्रणा जसे परिपत्रक काढून शाळेच्या वेळेत १ तास उशीर करते, तसाच शेतकऱ्यांचाही विचार करुन वीज देण्याची मागणीही शेतकऱ्यांनी ईटीव्ही भारतकडे केली आहे.
अंतयात्रा काढून अनोखे आंदोलन : उपलेटा पंथक या गावातील शेतकऱ्यांनी विजेची प्रतिकात्मक अंतयात्रा यात्रा काढून अनोख्या पद्धतीने शासनासमोर आपली मागणी मांडली आहे. या भागातील शेतकऱ्यांनी दिवसा वीजेची मागणी केली आहे. तसेच रात्रीच्या वेळी शेतीला वीज देण्याच्या पद्धतीचा निषेध केला. शासनाने शेतकरी, कुटुंबाला संरक्षण द्यावे, अशी मागणीही उपलेटा पंचायत समितीच्या माजी अध्यक्षांनी शासनाकडे केली आहे. याठिकाणी जमलेल्या शेतकऱ्यांनी शेतात अंत्ययात्रा काढून सरकारचा निषेध केला. यापुर्वीही शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी दिवसा वीज देण्याची मागणी केला, मात्र तोडगा न निघाल्याने शेतकऱ्यांनी अंत्ययात्रा काढत आपल्या संतप्त भावनांना वाट मोकळी करुन दिली.
हेही वाचा - Vulture Conservation : नाशकात होणार गिधाडांचा कृत्रिम जन्म, राज्यातील अंजनेरीत एकमेव संवर्धन, प्रजनन केंद्र