बाडमेर - भारतीय हवाई दलाच्या सी -130 जे सुपर हर्क्युलस ट्रान्सपोर्ट विमानाने NH-925 राष्ट्रीय महामार्गावर आपत्कालीन लँडिंग केले. NH-925 हा भारताचा पहिला राष्ट्रीय महामार्ग आहे. ज्याचा वापर हवाई दलाच्या विमानांच्या आपत्कालीन लँडिंगसाठी केला जाईल. युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास देशातील काही महामार्गांचा वापर हा हवाई दलाच्या लढाऊ विमानांसाठी 'रन वे' म्हणून व्हावा यासाठी ही सोय करण्यात आली आहे.
आपात्कालीन परिस्थितीत हायवेचा वापर रनवेत करण्यास सज्ज असणाऱ्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, हवाईदल प्रमुख आरकेएस भदोरिया आणि संरक्षण प्रमुख जनरल बिपीन रावत उपस्थित होते. 'सी -130 जे सुपर हर्क्युलस ट्रान्सपोर्ट विमाना'ने राजस्थानच्या जालोर येथील NH-925 राष्ट्रीय महामार्गावर आपत्कालीन लँडिंग केले.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) भारतीय हवाई दलाला आपत्कालीन लँडिंग करता यावी, यासाठी NH-925A च्या सट्टा-गंधव खंडाच्या तीन किलोमीटरच्या भागावर ही आपत्कालीन पट्टी तयार केली आहे.
लखनऊ-आग्रा हायवेवर विमानांचे लँडींग -
ऑक्टोबर 2017 मध्ये भारतीय हवाई दलाच्या लढाऊ आणि वाहतूक विमानांनी लखनऊ-आग्रा हायवेवर भारतीय एक-एक करुन लँडिंग केलं होतं. वायुदलाची 20 फायटर विमानं, सुखोई 30, हरक्युलस, जॅग्वार, मिराज आणि मिग यांसारख्या लढाऊ विमानांना महामार्गावर लँड करण्यात आलं होतं.
शत्रूवर पलटवार करण्यासाठी ही रणनीती महत्त्वाची -
युद्धस्थितीत रनवेचं नुकसान झाल्यास शत्रूवर पलटवार करण्यासाठी ही रणनीती महत्त्वाची ठरते. 1965 साली झालेल्या युद्धात पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी बॉम्ब टाकून भारताच्या एअरबेसची नासधूस केली होती. त्यामुळे भारतीय वायुसेनेला ऑपरेशन करताना अडचणी आल्या होत्या.
हेही वाचा - 13th BRICS Summit : पंतप्रधान नरेंद्र मोदी अध्यक्षस्थानी; अफगाण संकटावर चर्चा होण्याची शक्यता