नवी दिल्ली - मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानी स्फोटकांसह आढळलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली. त्यानंतर परमबीरसिंग यांनी मुख्यमत्री ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले. महिन्याला १०० कोटी रुपये खंडणी वसुल करण्याचे टार्गेट दिल्याच्या पत्रातील आरोपाचे आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणांचे पडसाद आज राज्यसभेतही पाहायला मिळाले.
यावेळी राज्यसभेच्या सभापतींनी परवानगी नाकारली असतानाही भाजपच्या खासदारांनी महाराष्ट्रातील गृहमंत्री देशमुख, परमबीरसिंग यांचे पत्र आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर सभागृहात गदारोळ निर्माण झाल्यानंतर सभापतींनी सभागृहाचे कामकाज स्थगित केले.
राज्यसभेत आज महाराष्ट्रातील खासदार प्रकाश जावडेकर, रामदास आठवले, यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान गृहमंत्री देशमुखांच्या १०० कोटी वसुली प्रकरणाचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. तसेच महाराष्ट्रात राष्ट्रपटी राजवट लागू कऱण्याची मागणी केली. आज पर्यंत दहशतवाद्यांनी स्फोटके ठेवल्याच्या घटना पाहिल्या होत्या. मात्र, या ठिकाणी पोलिसांनी बॉम्ब ठेवण्याचे काम केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. तसेच पोलीस आयुक्तासारख्या पदाधिकाऱ्यांने राज्याच्या गृहमंत्र्यांनी १०० कोटी रुपये वसुल करण्यास सांगितल्याचा आरोप केला. गृहमंत्र्यांचे हे प्रकरण गंभीर असल्याचे जावडेकर म्हणाले.