नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाची आज (बुधवार) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होणार आहे. सकाळी साडेदहा वाजता ही बैठक सुरू होणार आहे. बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा होणार किंवा निर्णय घेतले जाणार याबाबत स्पष्टता नाही.
याआधी १७ फेब्रुवारीला मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. उप लष्करप्रमुखांना २०० कोटी पर्यंतच्या वस्तू खरेदीचे अधिकार देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याद्वारे उप लष्करप्रमुखांना आर्थिक अधिकारी मिळाले. येत्या काही दिवसांत बंगाल आणि आसाम राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्रिय निवडणूक आयोगाची महत्त्वाची बैठक होणार आहे. त्याआधी केंद्रिय मंत्रिमंडळाची बैठक होत आहे.
देशातील ज्वलंत प्रश्न -
दरम्यान, देशात इंधनाचे दर दरदिवशी वाढतच आहेत. पेट्रोलचे दर अनेक राज्यात शंभर पार गेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांतून असंतोष व्यक्त केला जात आहे. डिझेलचे दरही ९० च्या जवळ आले आहेत. सोबतच घरगुती गॅसच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. दिल्लीत केंद्रिय कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. देशात कोरोना पुन्हा डोके वर काढू लागला आहे. त्यामुळे कॅबिनेट बैठकीत काय निर्णय घेतले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.