नवी दिल्ली - कोरोना संकटाने जगभरात थैमान घातल्यामुळे आरोग्य व्यवस्था, अर्थव्यवस्था, उद्योगधंदे, शिक्षण, मानसिक स्वास्थ्य यासर्वांपुढे आव्हान निर्माण झाले. शाळा बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे सर्वात जास्त नुकसान होत आहे. मात्र, युनिसेफने बालकांची स्थिती सुधारण्यासाठी काम सुरू केले आहे. गरीब, मागास, विकसनशील, अविकसित, युद्धजन्य आणि संघर्षाच्या वातावरणात राहणाऱ्या बालकांसाठी तर कोरोना महामारीने कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे.
कुपोषणाचा प्रश्न गंभीर -
जगभरात आधीपासूनच गरिबी, असमानता, बालकांमधील कुपोषण या समस्या आ वासून उभ्या होत्या. त्यात कोरोना महामारी आली. त्यामुळे बालकांचे शिक्षण आणि आरोग्य धोक्यात आले. बालकांना मदतीची पूर्वीपेक्षा जास्त गरज निर्माण झाली. पुढील वर्षात जगभरातील १९ कोटी बालकांपर्यंत पोहचण्यासाठी युनिसेफने महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. एकत्र मिळून काम केल्याने बालकांचे प्रश्न लवकरच सुटतील असा विश्वास युनिसेफने व्यक्त केला आहे.
व्हेनेझुएलातील दहा लाख विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहाच्या बाहेर -
युद्धजन्य वातावरण असणारे देश, विकसनशील, अविकसीत आणि अंतर्गत बंडाळी किंवा संघर्षमय स्थितीत राहणाऱ्या देशांवर युनिसेफने लक्ष केंद्रीत केले आहे. कठीण परिस्थिती शिक्षणाच्या सुविधा नसणाऱ्या देशांत युनिसेफ मदत पोहचवत आहे. आधीच कोरोनामुळे ९१ टक्के बालकांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे. व्हेनेझुएला सारख्या देशात सुमारे १० लाख विद्यार्थी शिक्षण व्यवस्थेच्या बाहेर फेकले गेले आहेत. तर आणखी १० लाख विद्यार्थी कायमची शाळा सोडण्याच्या मार्गावर आहेत.
येमेन देशात १० टक्के गंभीर कुपोषण वाढले
बालकांच्या कुपोषणाविरोधात मागील अनेक वर्षांपासून आपण सर्वजण लढा देत आहोत. मात्र, आर्थिक डबघाई आणि आरोग्य व्यवस्था ढासळल्याने कुपोषणाविरोधातील प्रयत्न मागे पडत आहेत. येमेन देशात १० टक्के गंभीर कुपोषणाच बालके आढळून आली आहेत. एक पिढीच नष्ट होण्यापासून वाचवायची असेल तर २०२१ वर्षात सर्व समस्यांविरोधात मोठे काम होण्याची गरज आहे.
नायजर देशात ७६ टक्के अल्पवयीन मुलींचे लग्न
अफगाणिस्तान, कॅमरून ते मोझांबिकसारख्या देशात बालकांवरील हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. हल्लेखोरांना मात्र, कदाचित पकडण्यात येत असून शिक्षेचा दरही कमी आहे. तसेच मुलींवर लैंगिक हल्ल्यांच्या घटनाही वाढत आहेत. बालविवाह आणि गर्भधारणेच्या घटनाही मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. नायजर देशात सुमारे ७६ टक्के मुलींचे लग्न वयाच्या १८ वर्षांच्या आतच होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.