न्यूयॉर्क - कोरोना महामारी संपेल हे स्वप्न जगाने पाहण्यास हरकत नाही, असे वक्तव्य जागतिक आरोग्य संघनटेचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी केले आहे. कोरोना चाचण्याचे सकारात्मक निकाल समोर येत असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या प्रमुखांनी जाहीर केल्यानंतर घेब्रेयेसस यांनी हे वक्तव्य केले आहे. जग महामारी संपण्याचे स्वप्न पाहू शकते, मात्र, श्रीमंत आणि शक्तीशाली देशांनी लस मिळवण्याच्या स्पर्धेत गरीब आणि अविकसीत देशांना पायदळी तुडवू नये, असा इशारा त्यांनी सर्वांना दिला.
कोरोनाने जगाला चांगल्या आणि वाईट गोष्टी दाखविल्या
कोरोना महामारीने जगाला मानवतेचं दर्शन चांगल्या पद्धतीने दाखवलं. त्याचबरोबर जगाची काळी बाजूही दाखवली. काही लोकांनी स्वत:चा विचार न करता इतरांसाठी निस्वार्थ भावनेने काम केले. दुसऱ्यांप्रती दया, कणव दाखवली. विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील लोकांनी अथक परिश्रम केले. जगाला एकतेचं दर्शन घडवले. मात्र, त्याचवेळी स्वार्थासाठी काम करणारे, दुफळी निर्माण करणारे आणि दोषारोप करणारेही जगाने पाहिले.
लस आल्याने जगातील इतर प्रश्न मिटणार नाहीत
घेब्रेयेसस यांनी कोणत्याही देशाचे नाव न घेता या कठीण काळात संधीच्या फायदा उचलणाऱ्या देशांवर टीकाही केली. विज्ञान क्षेत्रात वेगवेगळे कट आखले जात आहेत. दुफळी निर्माण करून एकतेला सुरुंग लावला जातोय, स्वार्थासाठी त्यागाचा बळी दिला जातोयं, त्यामुळे कोरोना वाढतच आहे, असे घेब्रेयेसस म्हणाले. कोरोना लसीमुळे जगापुढे उभे असलेली गरीबी, भूक, असमानता आणि हवामान बदल हे प्रश्न मिटणार नाहीत. महामारी संपल्यानंतर जगाने या प्रश्नांकडे लक्ष्य केंद्रीत करायला हवे, असे ते म्हणाले.