बक्सर (बिहार) : बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील डुमराव शहरात दोन नर्तकींनी समलैंगिक विवाह केला. हा विवाहसोहळा संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. या दोघीही गेल्या तीन वर्षांपासून कुरानसराई येथील एका ऑर्केस्ट्रा पार्टीमध्ये काम करत होत्या. या दरम्यान दोघींमध्ये जवळीक वाढली. आता त्यांनी सात फेरे घेत सात जन्म एकमेकींसोबत राहण्याची शपथ घेतली आहे.
लग्नाला कायदेशीर मान्यताही मिळवली : बक्सर जिल्ह्यातील या दोन्ही नृत्यांगना सुपौल आणि अररिया येथील रहिवासी आहेत. कोरनसरायच्या ऑर्केस्ट्रा पार्टीमध्ये काम करणारी त्रिवेणीगंज सुपौल येथील रहिवासी अनिशा कुमारी आणि जयनगर अररिया येथील रहिवासी पायल कुमारी यांनी डुमराव शहरातील डुमरेजानी मंदिरात लग्न केले. लग्ना आधी दोघींना डुमराव उपविभागीय न्यायालयात पोहचून आपल्या लग्नाला कायदेशीर मान्यता मिळवली. त्यानंतर, डुमरावच्या सर्वात प्रसिद्ध बांके बिहारी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर, दोघीही आपल्या साथीदारांसह डुमरेजानी मंदिरात पोहोचल्या आणि थाटामाटात लग्न केले. या दरम्यान पती बनलेल्या अनिशाने पत्नी बनलेल्या पायलला पुष्पहार घातला. यावेळी तिथे उभ्या असलेल्या ऑर्केस्ट्रा पार्टीच्या लोकांनी टाळ्या वाजवून दोघींचे अभिनंदन केले.
जिल्ह्यातील समलिंगी विवाहाची पहिलीच घटना : सुपौलचे रहिवासी असलेल्या ऑर्केस्ट्रा पार्टीचे संचालक लालजी यांनी सांगितले की, अनिशाचे कुटुंब या लग्नाला सहमत आहे तर पायलचे कुटुंबीय लग्नाला विरोध करत आहेत. असे असतानाही आता दोघांनी सर्व बंधने झुगारून एकत्र राहण्याची शपथ घेतली आहे. जिल्ह्यातील समलिंगी विवाहाची ही पहिलीच घटना आहे. विशेष म्हणजे डुमराव उपविभागाचे एएसपी श्रीराज आणि एसडीएम कुमार पंकज यांना या प्रकरणाबाबत विचारणा केली असता त्यांनी लग्नाची अशी कोणतीही माहिती असल्याचे नाकारले. यात पोलिसांची भूमिका नसल्याचे एएसपी यांनी सांगितले. याबाबत स्थानिक पोलीस ठाण्यातून माहिती मिळेल, असे ते म्हणाले.
समलैंगिक विवाह काय असतो? : समलैंगिक विवाह म्हणजे एकाच लिंगाच्या दोन व्यक्तींने लग्न करणे होय. म्हणजेच काय तर पुरुषाने पुरुषाशी आणि मुलीने मुलीशी लग्न करणे. सध्या भारतात समलैंगिक विवाहांसाठी कुठलीही कायदेशीर तरतूद नाही. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दोघांची सहमती असल्यास हे नाते कायम ठेवता येते. जगभरात एकूण ३२ देशांनी समलैंगिक विवाहाला मान्यता दिली आहे. यापैकी बहुतेक देश युरोपातील किंवा दक्षिण अमेरिकेतील आहेत. भारतात असा विवाह करणे हा गुन्हा नाही मात्र अजून अशा विवाहाला काही देशांनी कायदेशीर मान्यता दिलेली नाही.
नवनीत राणांनी केली आहे टीका : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी समलैंगिक विवाहावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. अमरावती शहरातील श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी तरुण पिढीवर आणि आजकालच्या समलैंगिक विवाहबाबत प्रश्न उपस्थित केले. तसेच नवनीत राणा यांनी 'लिव्ह इन रिलेशनशिप'वर देखील भाष्य करत तरुण पिढीला भान राखण्याचे आवाहन केले आहे.