चंदीगढ : बुधवारी चंदीगढजवळील कजहेडी गावात असलेल्या जंगलात दोन तरुणांचे मृतदेह आढळून आल्याने घबराट पसरली आहे. जंगलातून जाणार्या नागरिकांनी मृतदेह पाहिल्यानंतर पोलिसांना माहिती दिली. दुसरीकडे पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही तरुणांचे मृतदेह शासकीय रुग्णालयाच्या शवागारात आणले. मिळालेल्या माहितीनुसार, जंगलात सापडलेले दोन तरुणांचे मृतदेह हे महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
कॅबिनेट मंत्र्याचा जवळचा नातेवाईक : या दोन्ही तरुणांनी आत्महत्या करून जीवन संपवल्याचे बोलले जात आहे. दोन्ही मृत तरुणांचे वय 25 ते 30 वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, मयत हरीश हा महाराष्ट्रातील रहिवासी असून तो महाराष्ट्रातील एका कॅबिनेट मंत्र्याचा जवळचा नातेवाईक असल्याचे सांगण्यात येत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या दोन्ही तरुणांनी चंदीगढला आल्यानंतर ज्या प्रकारे आत्महत्या केली. त्यामधून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या आत्महत्येचे गूढ अजून उलगडले नसल्याने, ही आत्महत्या आहे की, हत्या हे अजून स्पष्ट होणे बाकी आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.
पुराव्यांच्या आधारे दोन्ही तरुण महाराष्ट्रातील : जंगलात मृतदेह आढळल्याने कजहेडी गावात दहशतीचे वातावरण आहे. जंगलातून जाणाऱ्या एका प्रवाशाने सेक्टर-36 पोलीस ठाण्याला मृतदेहाची माहिती दिली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन जवळच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवले. दोन्ही तरुणांकडून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलीस तपास करीत आहेत.
पोलिसांकडून खासगी हॉटेलमध्ये तपास : दोन्ही तरुणांची माहिती घेण्यासाठी सेक्टर-36 पोलिस ठाण्याचे तपास पथक कजहेडीजवळील हॉटेलचालकांची चौकशी करीत आहे. कारण कजहेडी गावात हॉटेलच्या खोल्या स्वस्त दरात उपलब्ध आहेत. जवळच बसस्थानक आणि रेल्वे स्थानक असल्यामुळे कजहेडी येथील खासगी हॉटेलमध्ये लोक राहणे पसंत करतात. त्याचवेळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी उपस्थित असलेली परिस्थिती पाहता दोन्ही तरुणांनी एकत्र आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे.