पणजी - गोव्याचे माजी मुख्यमंत्री रवी नाईक (Ravi Naik Join BJP) यांनी भाजपात प्रवेश केला आहे. आता काँग्रेसचे अन्य 2 आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट राज्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. मंगळवारी रात्री ते माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्या पक्ष प्रवेशवेळी बोलत होते.
फोंडयाचे विद्यमान काँग्रेस आमदार रवी नाईक यांनी मंगळवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा सभापती राजेश पाटनेकर यांच्याकडे सुपुर्द केला. यानंतर त्यांनी मंगळवारी रात्री उशिरा भाजपात प्रवेश केला. नाईक आगामी विधानसभा निवडणूक फोंडा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर लढणार आहेत.
दरम्यान, रवी नाईक यांच्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे विधानसभेचे ज्येष्ठ नेते आमदार प्रतापसिंह राणे व अन्य एक आमदार भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळेच राज्यातील काँग्रेसचे दोन आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचा खुलासा राज्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
काँग्रेस रसातळाला - फडणवीस
2017 च्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक आमदार असणाऱ्या काँग्रेसचे राज्यात आता तीनच आमदार उरले आहेत. अन्य सर्वच आमदारांनी आधीच भाजपचा झेंडा हाती घेतला होता. रवी नाईक यांच्यापाठोपाठ अन्य 2 आमदारांनी भाजपात प्रवेश केला तर एकमेव म्हणजे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत पक्षात शिल्लक राहणार आहेत. त्यामुळे काँग्रेस रसातळाला गेली असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.