सूरजपूर (छत्तीसगड) : छत्तीसगडमध्ये एकीकडे आदिवासी त्यांच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठवत आहेत, तर दुसरीकडे आता आदिवासींना मारहाण होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. नुकतीच मध्य प्रदेशातील सीधी येथे एका आदिवासी तरुणासोबत घडलेली लघुशंका घटना ताजी असतानाच, छत्तीसगडमध्ये एका आदिवासीवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे. सूरजपूर येथे एका ग्रेडर मशीन ऑपरेटरने आदिवासी तरुणाला जेसीबीला बांधून मारहाण केल्याचा आरोप आहे.
जेसीबीला बांधून मारहाण : सूरजपूर ते चांदोरा हा रस्ता तयार करण्याचे काम सुरू होते. त्यावेळी तेथे काम करणाऱ्या एका ग्रेडर मशीन ऑपरेटरवर आदिवासी तरुणाला मारहाण केल्याचा आरोप आहे. रस्त्याचे काम करणाऱ्या लोकांनी त्याला जेसीबीला बांधून बेदम मारहाण केल्याचे आदिवासी तरुणाचे म्हणणे आहे. याप्रकरणी प्रतापपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तिघांनी पीडित आदिवासी तरुणावर मोबाईल चोरीचा आरोप करत त्याच्याशी गैरवर्तन केले. त्याचे हात दोरीने जेसीबीला बांधून निर्दयीपणे मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. आरोपीची ओळख पटल्यानंतर तिघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची पोलिसात तक्रार केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी आरोपीने पीडिताला दिला होती. - किशोर केरकेट्टा, पोलीस स्टेशन प्रभारी
तीन जणांना अटक : या तीन आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 294 (अश्लील कृत्य), 323 (दुखापत करणे), 341 (चुकीच्या पद्धतीने अडवणे), 506 (धमकावणे) आणि अनुसूचित जाती-जमाती (प्रतिबंध) या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आत्तापर्यंत तीन जणांना अटक केली आहे. या घटनेत आता आणखी एका आरोपीचा सहभाग असल्याचे समोर येत आहे.
मी मायापूर गावातून सरहरी गावी जात होतो. सकाळी सात वाजताच्या सुमारास जेथे रस्त्याचे काम सुरू होते, तिथे मी ग्रेडर मशीनजवळ उभा होतो. तेवढ्यात ग्रेडर मशीनचा ऑपरेटर त्याच्या दोन साथीदारांसह आला. यानंतर त्यांनी माझ्यावर मोबाईल चोरीचा आरोप करत बेदम मारहाण केली. मारहाण करणाऱ्यांनी त्यांची नावे अभिषेक पटेल, कृष्णकुमार पटेल आणि सोनू राठोड असे असल्याचे सांगितले. - पीडित तरुण
तक्रारीनंतर तातडीने कारवाई केली : याप्रकरणी गुन्हा दाखल करून तातडीने कारवाई केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. आरोपींची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी पीडिताच्या गावात पोहोचून तिन्ही आरोपींना अटक केली. पोलिसांनी अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत अटक करण्यात आलेले तिन्ही आरोपी मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
हेही वाचा :