मुंबई : आज दिवसभरात कोठे काय असणार, आजच्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊया या बुलेटीनच्या माध्यमातून. देशभरासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा वाचा एका क्लिकवर. (Read Top News Today )आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यांना जेल की बेल याचा निर्णय आज होणार आहे. या आधी महाविकास आघाडीच्या अनिल देशमुखांना ( Anil Deshmukh ) ईडीच्या प्रकरणात जामीन मिळाला आहे, तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनाही जामीन मिळाला आहे. आता नवाब मलिक यांचे काय होणार याचा निर्णय आज होणार आहे.
रविकांत तुपकर यांचे आज जलसमाधी आंदोलन : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर अरबी समुद्रात शेतकऱ्यांसह जलसमाधी आंदोलनात सामील होण्यासाठी निघाले आहेत. रविकांत तुपकर त्यांच्या 600 कार्यकर्त्यांसह 60 ते 70 गाड्यांचा ताफा बुलढाण्यातून निघाला आहे. या आंदोलनात मराठवाड्यातील बीड, परभणी, जालना, औरंगाबाद, नगर जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते ठिकठिकाणाहून सामील होणार असल्याचा दावा करण्यात येतोय. बुलढाण्याहून हा ताफा बुलढाणा-सिल्लोड-औरंगाबाद-नगर-पूणे मार्गे जाऊन मुंबईत येणार आहे. रविकांत तुपकर यांनी आज सकाळी मंत्रालयाजवळ असलेल्या अरबी समुद्रात कार्यकर्ते जलसमाधी घेणार असल्याचा इशारा दिला. दरम्यान, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 157 कोटीची मदत जाहीर करण्यात आली आहे. परंतु जाहीर झालेली मदत ही तुटपूंजी असून आपण जलसमाधीवर ठाम असल्याचे तुपकरांनी म्हंटले आहे.
नवाब मलिकांना बेल की जेल? सत्र न्यायालय निर्णय देणार : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज सत्र न्यायालय निर्णय देणार आहे. मलिक यांच्या अर्जावर दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांनी निर्णय राखून ठेवला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी कनेक्शन असल्याच्या आरोपावरून ईडीने त्यांना 23 फेब्रुवारीला अटक केली होती. मलिक सध्या कुर्ला येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. यापूर्वी मलिकांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. जवळपास पाच महिने उलटूनही तपास यंत्रणेकडून सबळ पुरावे दाखल करण्यात आले नसल्याचा दावा मलिकांकडून करण्यात आला आहे.
बैलगाडा शर्यतींबाबत आज सुप्रीम कोर्टात घटनापीठासमोर सुनावणी : बैलगाडा शर्यतीबाबत महाराष्ट्र आणि जलिकट्टूबाबत कर्नाटक आणि तमिळनाडूतील प्रकरणं आज एकत्रित ऐकली जाणार आहेत. डिसेंबर 2021 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने ग्रामीण महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला होता. आता घटनापीठ याबाबत अंतिम निर्णय काय देणार याची उत्सुकता असेल.
पवार इन अॅक्शन मोड, आज राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक : आजारपणानंतर शरद पवार आज पहिली बैठक घेणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी प्रदेश कार्यालय येथे राष्ट्रवादीच्या सर्व महत्त्वाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये शरद पवार आगामी निवडणुकांसाठी स्थानिक परिस्थितीचा आढावा घेणार असल्याची माहिती आहे.