आज 'या' बातम्यांवर असेल नजर -
- दिल्ली - केंद्र सरकारने गत वर्षी तीन कृषी कायदे पारित केले आहे. या कायद्याच्या विरोधात देशाच्या विविध भागांतील मागील दहा महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. या आंदोलनाचा एक भाग म्हणून देशातील विविध शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी आज (27 सप्टेंबर) भारत बंदची घोषणा केली आहे. 17 सप्टेंबर, 2020 रोजी केंद्र सरकारने संसदेत कृषी विषयक तीन कायदे पारित केले होते. या विरोधात नोव्हेंबर, 2020 पासून शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले आहे. या आंदोलनास महाराष्ट्रातीलही काही शेतकरी संघटना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे.
- मुंबई - कृषी कायदे रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. भाजपचा निषेध करण्यासाठी मुंबई काँग्रेसतर्फे संपूर्ण मुंबईत निदर्शने करण्यात येणार आहे.
- मुंबई - गुलाब चक्रीवादळामुळे विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व कोकणात काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.
- आज जागतिक पर्यटन दिवस आहे.
कालच्या महत्त्वाच्या बातम्या -
पुणे - सर्वांचेच लक्ष लागले होते कि, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्लीला का गेले आहेत. अनेकांच्या मनात शंका होती. अनेक जण देव पाण्यात घालून बसले होते. मात्र मुख्यमंत्री हे परत मुंबईला आले आहेत. ते अमित शहा यांनाही भेटले मात्र त्यांच्यात कोणतीही वैयक्तिक चर्चा झालेली नाही. ज्या शासकीय कामासाठी ते गेले होते तेवढच काम करून आले आहेत. हे सरकार अजून तीन वर्ष चालणार आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच तीन वर्ष मुख्यमंत्री असणार आहेत. त्याचबरोबर 2024 नंतर देखील मुख्यमंत्री तेच असणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या 105 आमदारांच्या विरोधी पक्षाला या राज्यात कोणत्या प्रकारचे कार्य केलं पाहिजे यासाठी पुण्यासह सगळ्या शहरांमध्ये प्रशिक्षण केंद्र उभारू, स्वप्न बघण्यावर बंदी आणू, 5 वर्ष खूप स्वप्न आपण पहिली आत्ता बघू नका. कारण तुम्ही कितीही आपटली तरी ठाकरे सरकारचा तुम्ही बाल ही बाका करू शकत नाही, असो सणसणीत टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला हाणला आहे. सविस्तर वाचा ...
मुंबई - न्यास कम्युनिकेशन प्रा. लि. या एकमेव कंपनीला डोळ्यासमोर ठेवून आरोग्य विभागाच्या भरती परिक्षेचे कंत्राट देताना आपल्याच शासन निर्णयात वेळोवेळी सरकारने फेरबदल केले. न्यास कंपनीला काम मिळवून देण्यासाठी अनेक वेळा शुध्दीपत्रक काढून निविदांमधील अटी व शर्थीमध्ये गैरलागू बदल केले, काही अटी शिथिल केल्या. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या शासकीय भरतीतल्या महाघोटाळ्याचा पर्दाफाश झाला असून या महाघोटाळ्याला जबाबदार राज्याचे आरोग्य मंत्री, आरोग्य सचिव, संचालक, महाआयटीचे मंत्री, राज्यमंत्री, सचिव असल्याचा खळबळजनक आरोप विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. या महाघोटाळ्याची सीबीआय, सीआयडी अथवा निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे. मात्र सरकारने चौकशी केली नाही तर, विद्यार्थ्यांना घेऊन तीव्र आंदोलनाचा इशाराही दरेकर यांनी दिला आहे. राज्यातील आरोग्य विभागाच्या गट 'क' व 'ड' पदासाठी होणारी परिक्षा अचानक रद्द झाल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. त्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे. रविवारी मुंबईत पत्रकार परिषदेतून त्यांनी हा आरोप लावला आहे. सविस्तर वाचा ...
सांगली - इंग्लंडच्या मॅन्चेस्टरमध्ये सापडलेल्या खुर्च्यांची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे. तासगावच्या सावळज येथील बाळू लोखंडे या मंडपवाल्याच्या या खुर्च्या मॅन्चेस्टरमधील एका हॉटेलबाहेर अगदी थाटात बसण्यासाठी वापरल्या जात आहेत. मात्र, खुर्च्या तिथे पोहोचल्या कशा? याबाबतही आता कुतूहल निर्माण झाले आहे. सविस्तर वाचा ...
मुंबई - मुंबई महापालिकेने मालमत्ता कराच्या वसुलीसाठी कडक कारवाई सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून दोन वर्षांपूर्वी जप्त केलेल्या हेलिकॉप्टरचा लिलाव करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी एका तज्ज्ञ समितीची नियुक्ती केली जाणार असून त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार हेलिकॉप्टरचा लिलाव केला जाणार असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. मालमत्ता कर वसुलीसाठी पालिकेकडून हेलिकॉप्टरचा लिलाव होणे ही पहिलीच घटना आहे. सविस्तर वाचा ...
मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. रोज तीन ते चार हजार रुग्ण आढळून येत आहेत. शनिवारी 3 हजार 276 तर, रविवारी 26 सप्टेंबरला 3 हजार 206 नवे रुग्ण आढळून आले आहेत. सविस्तर वाचा ...
जाणून घ्या आजचे राशीभविष्य -