- राज्य सरकारकडून आज नव्या निर्बंधांची होणार घोषणा -
राज्यात कोरोनाचा विळखा घट्ट होताना दिसत आहे. यामुळे सद्या लागू असलेले निर्बंध अधिक कठोर करण्याचे स्पष्ट संकेत राज्य सरकारने दिले आहेत. आज कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात येणार आहेत. यात सरसकट लॉकडाऊन ऐवजी शहरनिहाय निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. यात नाट्यगृहे, चित्रपटगृहे, उपहारगृहे, मॉल बंद ठेवण्याबरोबर काही शहरांमध्ये दुकाने सम-विषम पद्धतीने सुरू ठेवण्याचा प्रस्ताव आहे.

- परमबीर सिंह यांच्या याचिकेवर होणार सुनावणी
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरिल आरोपांच्या सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

- रेडीरेकनरच्या दरवाढीबाबत आज निर्णय
कोरोनाचे संकट अद्यापही कायम असल्याने आणि गेल्या वर्षी वाढवण्यात आलेल्या वार्षिक मूल्यदरांना (रेडीरेकनर) अद्याप सहाच महिने झाले असल्याने यंदा रेडीरेकनर दरात वाढ करायची किंवा कसे? याबाबतचा निर्णय आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत होण्याची शक्यता आहे. रेडीरेकनरच्या दरांमध्ये सुसूत्रीकरण करण्याबाबतचा प्रस्ताव नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून राज्य सरकारला पाठवण्यात आला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतरच याबाबतची स्पष्टता येणार आहे.

- आज केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक
आज केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत देशात वाढत चाललेल्या कोरोनाच्या संसर्ग रोखणे, यासह विविध विषयावर चर्चा होणार असल्याचे सांगितलं जात आहे.

- संयुक्त किसान मोर्चाची पत्रकार परिषद
केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन नवे कायदे तात्काळ रद्द करण्यात यावेत, या मागणीसाठी मागील १२५ दिवसांपासून दिल्लीच्या बॉर्डरवर शेतकरी आंदोलन करत आहेत. अद्याप या प्रश्नावर तोडगा निघालेला नाही. आज संयुक्त किसाम मोर्चाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यात पत्रकार परिषदेत मोर्चाची पुढील दिशा स्पष्ट केली जाणार आहे.

- राहुल गांधी आज आसाममध्ये करणार रॅली
आसाम विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी आसाम दौऱ्यावर आहेत. यात ते आज आसाममध्ये दोन ठिकाणी रॅली काढणार आहेत. राहुल या रॅलीनंतर सभेला संबोधित करणार आहेत.

- माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचा प्रचार दौरा -
माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम आज डीएमके नेते एमके स्टालिन यांच्या समर्थनार्थ कोलाथूर मतदारसंघात प्रचार करणार आहेत.

- पटना-मंडूआडीह जनशताब्दी एक्सप्रेस आज धावणार
आजपासून पटना-मंडूआडीह जनशताब्दी एक्सप्रेस पुन्हा धावणार आहे. या रेल्वेमुळे बिहार आणि यूपी दरम्यानचा प्रवास सुलभ होणार आहे. वाराणसीसह, यूपीच्या गाजीपूर, बिहारच्या बक्सर, आरा, पटना यासह काही जिल्ह्यातील प्रवाशांना या रेल्वेचा फायदा होणार आहे.

- प्रियंका गांधीच्या केरळ दौऱ्याचा आज दुसरा दिवस
प्रियंका गांधी केरळ विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केरळ दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. त्या आज त्रिशूर येथे रोड शो करणार आहेत. दरम्यान, केरळमध्ये ६ एप्रिल रोजी १४० जागेसाठी निवडणुका होणार आहेत.

- भारताचा बॉक्सिंग संघ होणार आज पोलंडला रवाना
पोलंडच्या किलसमध्ये १० ते २४ एप्रिल या दरम्यान, एआयबीए युवा पुरूष आणि महिला विश्व बॉक्सिंग चॅम्पियम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी भारताचा २० सदस्यीय संघ आज रवाना होणार आहे.
