आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस
आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे, दरम्यान आज विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. तसेच अधिवेशनादरम्यान विरोधकांकडून निदर्शने देखील केली जाऊ शकतात. विविध विषयांच्या पार्श्वभूमीवर आजचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे.

शेतकरी नेते राजू शेट्टी यांची वीजबिलाच्या मुद्द्यावर आज कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर आज सकाळी साडेअकरा वाजता कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद होणार आहे. दरम्यान वाढीव वीजबिल कमी करावे, शेतकऱ्यांना वीजबिल भरण्याची सक्ती करू नये, अशा विविध मुद्द्यांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यापूर्वी देखील आंदोलन केले आहे. त्यामुळे वाढीव वीज बिलाबाबत आजच्या पत्रकार परिषदेमध्ये राजू शेट्टी काय बोलतात हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शेतकरी नेते राकेश टिकैत आज राजस्थान दौऱ्यावर
शेतकरी नेते राकेश टिकैत हे आज राजस्थान दौऱ्यावर आहेत. नागौर जिल्ह्यामध्ये किसान महापंचायतीचे आयोजन करण्यात आले असून, राकेश टिकैत हे या किसान महापंचायतीमध्ये सहभागी होण्यासाठी नागौरमध्ये येणार आहेत. ते किसान महापंचायतमध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना संबोधित करणार आहेत.

दिल्ली- कोटद्वार मार्गावर आजपासून सिद्धबली जनशताब्दी एक्सप्रेस सुरू होणार
सिद्धबली जनशताब्दी एक्सप्रेस आजपासून कोटद्वार-दिल्ली मार्गावर सुरू होणार आहे. या नवीन रेल्वे सेवेची सर्व तयारी रेल्वे प्रशासनाने पूर्ण केली असून, केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक हे अभासी माध्यमातून या रेल्वे सेवेचे उद्घाटन करणार आहेत.

दिल्ली महापालिकेच्या पोटनिवडणुकीची आज मतमोजणी
दिल्ली महापालिकेच्या 5 जागांसाठी 28 फेब्रुवारीला मतदान झाले होते. अखेर उमेदवारांची प्रतीक्षा संपली असून, आज मतमोजणी होणार आहे. मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून, 5 केंद्रावर मतमोजणी होणार आहे.

मध्य प्रदेशमध्ये होणाऱ्या ग्रामपंचायत व पालिका निवडणुकांसाठी आज मतदार यादी होणार जाहीर
मध्य प्रदेशमध्ये ग्रामपंचायत आणि पालिका निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज मतदान यादी जाहीर करण्यात येणार आहे. लवकरच निवडणुकांच्या तारखेची देखील घोषणा होणार आहे.

उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिरात आजपासून शिवरात्रोत्सवाला सुरुवात
आजापासून उज्जैन मधील महाकालेश्वर मंदिरात शिवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. या उत्सवाची जय्यत तयारी मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. या उत्सवात मोठ्या संख्येने भाविक सहभागी होत असतात. यंदा 3 ते 12 मार्चदरम्यान हा उत्सव साजरा होणार आहे.
