नवी दिल्ली : टिकटॉक चाहत्यांसाठी आनंदाचीच बातमी आहे. लोकप्रिय व्हिडिओ प्लॅटफॉर्म टिकटॉक भारतात पुनरागमन करण्याच्या तयारीत असून लवकरच हा व्हिडिओ प्लॅटफॉर्म पुन्हा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. टिकटॉकची पॅरेंट कंपनी असलेल्या बाईटडान्स ने TickTock या नव्या ट्रेडमार्कसाठी भारतात अर्ज केल्याचा दावा मुकुल शर्मा नावाच्या एका ट्विटर युझरने केला असून यासोबत बाईटडान्सच्या अर्जासंदर्भातील माहितीही त्याने शेअर केली आहे. त्यामुळे आता टिकटॉक खरंच पुन्हा सुरू होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
टिकटॉकचा नवा अर्ज
टिकटॉकचे सुरूवातीचे नाव TikTok असे होते. आता बाईटडान्सने TickTock या ट्रेडमार्कसाठी अर्ज केला आहे. त्यामुळे या नावाने टिकटॉक लवकर भारतात पुन्हा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या या व्हिडिओ प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यातील हजारो लोक चांगलेच लोकप्रिय झाले होते. टिकटॉकने प्रसिद्धी मिळालेल्या टिकटॉक स्टार्सचे एक वेगळेच विश्व यामुळे निर्माण झाले होते. मात्र यावर केंद्राने बंदी घातल्यानंतर टिकटॉक स्टार्सनी इतर प्लॅटफॉर्मवर पुन्हा जम बसविल्याचेही चित्र बघायला मिळाले. मात्र आता टिकटॉक पुन्हा सुरू झाल्यास हे टिकटॉक स्टार पुन्हा आपल्या आवडीच्या प्लॅटफॉर्मवर चाहत्यांना भेटू शकतात असे बोलले जात आहे.
हेही वाचा - मुंबई उच्च न्यायालयाचा चीनी 'बाईटडान्स'ला दणका