नवी दिल्ली- कोरोनाचा उद्रेक सुरू असताना दिल्ली सरकार व पोलीस प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. ज्यांनी तुरुंगामध्ये असायला हवे, असे लोक सध्या दिल्लीमध्ये खुलेआम फिरत आहेत. कोरोनाच्या काळात गुन्हेगारी वाढण्यामागे हे लोक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, त्यांच्याकडे आजवर कुणीही लक्षही दिलेले नाही. असे लोक म्हणजे तिहारमधील तुरुंगामधून पॅरोलवर असताना बेपत्ता झालेले कैदी आहेत.
केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्यासाठी तिहार तुरुंगामधील कैद्यांना पॅरोल आणि अंतिरम जामिन देऊन 6,500हून अधिक जणांना सोडले. मात्र, त्यामधील 3,400 हून अधिक कैदी नियमाप्रमाणे तुरुंगात आले नाहीत.
धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहेत. या कारणाने दिल्ली पोलिसांसह तिहार तुरुंग प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. हे कैदी बाहेर मोकाट असताना त्यांच्याकडून गंभीर गुन्हे घडण्याची पोलिसांना भीती आहे.
तिहार तुरुंगाचे माजी कायदा अधिकारी सुनिल गुप्ता म्हणाले, की कोरोनाचा संसर्ग सुरू असताना 2020 मध्ये तुरुंगातील कैद्यांचे प्रमाण क्षमतेहून दीडपट होते. अशा परिस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी 6,500 कैद्यांना सोडण्यात आले होते. त्यापैकी 1184 कैदी हे तिहार तुरुंग आणि दिल्ली सरकारकडून आपत्कालीन पॅरोलवर सोडण्यात आले होते. 5,556 कच्च्या कैद्यांना सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीच्या नियमाप्रमाणे अंतरिम जामिन देऊन सोडण्यात आले होते. मागील डिसेंबर महिन्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर कैद्यांना मुदत संपल्याने शरण करण्याचे प्रशासनाने आवाहन केले होते. तरीही 50 टक्क्यांहून अधिक कैदी शरण आले नाहीत.
हेही वाचा-सरसंघचालक मोहन भागवतांना कोविड रुग्णालयातून डिस्चार्ज, विलगीकरणात राहण्याच्या सूचना
एवढे कैदी कुठे गेले?
तिहार तुरुंगाचे माजी कायदा अधिकारी सुनील गुप्ता म्हणाले, की तिहार तुरुंगामधून अंतिरम जामिनवर सर्व प्रकारचे कैदी सोडण्यात आले होते. त्यामध्ये किरकोळ गुन्ह्यासह खुनासारख्या प्रकरणातील गुन्हेगारांचा समावेश होते. या कैद्यांना 45 दिवसांसाठी अंतरिम जामिन देण्यात आला होता. मात्र, कोरोनाचा संसर्ग वाढता त्यामध्ये अनकेदा मुदतवाढ देण्यात आली होती. माध्यमात आलेल्या वृत्तानुसार अनेक कैदी परत तुरुंगात गेले नसल्याची माहिती मिळाली आहे. काही कैद्यांना पॅरोलसाठी मुदतवाढ मिळाली असावी, असी त्यांनी शक्यता व्यक्त केली. तर बरेच कैदी या संधीचा फायदा घेत फरार झाले असावेत, अशी शक्यताही गुप्ता यांनी व्यक्त केली.
हेही वाचा-लॉजमधील हाय-प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; १० जणांना अटक, ८ महिलांची सुटका
कैदी बाहेर फिरल्यास गुन्ह्यांत होणार वाढ
दिल्ली पोलिसाची माजी एसपीबी वेदभूषण म्हणाले की, पॅरोवर सुटका झालेल्या कैद्यांना अटक करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. दिल्लीत कोरोनाचा संसर्ग धडकी भरविणारा आहे. नुकतेच 300 हून अधिक पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अशा स्थिती बेपत्ता झालेल्या कैद्यांना शोधणे हे पोलिसांसाठी मोठे आव्हान आहे. तिहार तुरुंगाचे डीजी संपीद गोयल म्हणाले, की वापस न आलेल्या कैद्यांची माहिती दिल्ली पोलिसांना देण्यात आली आहे. त्या कैद्यांबाबत माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.
कसा मिळतो पॅरोल?
तुरुंगातील कैदी पॅरोलसाठी प्रशासनाला अर्ज करतो. या अर्जामुळे कैद्यांना कोणत्या कारणासाठी पॅरोलवर हवा आहे, हे समजू शकते. कैद्यांची वागणूक पाहून कैद्यांचे अर्ज हे दिल्ली प्रशासनाकडे पाठविले जातात. दिल्ली पोलिसांकडून अर्जाला परवानगी मिळाल्यानंतर कैद्यांना पॅरॉलवर सोडण्यात येते. जर तुरुगांचे पॅरोलचे अर्ज दिल्ली प्रशासनाने फेटाळले तर त्यांना पॅरोल मिळू शकत नाही.
आपत्कालीन पॅरोल म्हणजे काय?
तिहार तुरुंगात आपत्कालीन पॅरोलची सुविधा आहे. कोरोनासारख्या विशिष्ट परिस्थितीमध्ये अशी पॅरोल दिली जाते. ही पॅरॉल जास्ती जास्त 45 दिवसांसाठी दिली जाते. त्यामध्ये प्रशासनाकडून वाढ होऊ शकते.
कैद्यांना अंतरिम जामिन कसा मिळतो?
अंतरिम जामिन मिळण्यासाठी कैद्याला न्यायालयात विनंती करावी लागते. वकिलाच्या माध्यमातून अंतरिम जामिन का द्यावा, याची माहिती दिली जाते. न्यायालयाकडून अंतरिम जामिन देण्याबाबत निर्णय घेतला जातो.
तुरुंगात परत न आलेल्या कैद्यांवर काय होणार कारवाई?
तिहार तुरुंगाचे माजी कायदा अधिकारी सुनील गुप्ता म्हणाले, की बेपत्ता झालेल्या कैद्यांची माहिती तिहार तुरुंग प्रशासाने दिल्ली पोलिसांना दिली आहे. दिल्ली पोलीस शोधून कैद्यांना अटक करणार आहे. संबंधित न्यायालयात कैद्यांना हजर केले जाणार आहे. त्यानंतर कैद्यांची पुन्हा तुरुंगात रवानगी केली जाणार आहे. भविष्यात अशा कैद्यांना पॅरोल मिळण्यात अडचणी येतात.
बेपत्ता झालेले कैदी कोणत्या गुन्ह्यात सहभागी झाले होते, हा महत्त्वाचा मुद्दा नाही. तर नियमांचे पालन का करण्यात आले नाही, हा मुद्दा आहे. दिल्लीमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. अशा स्थितीत गुन्हेगारी प्रवृत्ती असलेले 3 हजारांहून अधिक कैदी बेपत्ता झाल्याने पोलिसांची चिंता वाढली आहे. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या दिल्ली पोलीस प्रशासनाने यावर गांभीर्याने पावले उचलण्याची गरज आहे.
20 ऑक्टोबरपर्यंतची आकडेवारी-
दिल्लीमध्ये गुन्ह्यांचे वाढते प्रमाण
- गुन्हे - वर्ष 2019 - वर्ष 2020
- लूट - 1,956 - 1,963
- लूट प्रकरणात अटक - 3,535 - 3,594
- चोरी- 6266 - 7965
चोरीच्या प्रकरणात अटक- 5243 - 6496
हत्याराने खुनाचा प्रयत्न- 242 - 258
तिहार तुरुंगातील कैद्यांबाबतची आकडेवारी
- आपत्कालीन पॅरोलवर सोडण्यात आलेले कैदी-1185
- आपत्कालीन पॅरोलवरून परत आलेले कैदी- 1073
- आपत्कालीन पॅरोलवरून फरार झालेले कैदी - 112
- अंतरिम जामिनवर सोडण्यात आलेले कच्चे कैदी- 5556
- अंतरिम जामिनवरून परत आलेले कच्चे कैदी- 2200
- अंतरिम जामिनवरून फरार झालेले कच्चे कैदी- 3356
15 एप्रिलपर्यंतची आकडेवारी
- गंभीर गुन्ह्यातील आरोपींना कैद्यांना मिळालेली जामिन- 2318
- किरकोळ गुन्ह्यात आरोपींना कैद्यांना मिळालेली जामिन -2907
- उच्च न्यायालयाकडून कैद्यांना मिळालेली जामिन 356