तुमकूर : चार वर्षाच्या वाघाचा सिमेंटच्या पाईपात संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. ही घटना कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या परिसरात वाघाचे अस्तित्व पहिल्यांदाच आढळले आहे. मात्र वाघ मृतावस्थेत आढळल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
तुमकूरच्या जंगलात वाघाचे नव्हते अस्तित्व : तुमकूर जिल्ह्यातील गुब्बी तालुक्यात असलेल्या अंकसंद्रा या जंगल परिसरात वाघाचे कोणतेही अस्तित्व नव्हते. त्यामुळे या परिसरात वाघ आला कसा असा प्रश्न उपस्तित होत आहे. याबाबतची माहिती वनविभागालाही नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. वाघाचे अस्तित्व नसल्याने या परिसरात आलेला वाघ मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे.
अंकसंद्रा परिसरात आढळला वाघाचा मृतदेह : तुमकूर जिल्ह्यातील गुब्बी तालुक्यातील अंकसंद्रा राखीव वनक्षेत्रात चार वर्षाचा वाघ असल्याची चर्चा गेल्या काही दिवसात सुरू होती. मात्र तुमकूरमध्ये वाघ येण्याची शक्यता नसल्याने ही चर्चा अफवा असल्याचे नागरिक समजत होते. त्यातच अंकसंद्रा येथील परिसरात वाघाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. हा वाघ सिमेंटच्या पाईपमध्ये गेला होता. त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे दिसत आहे. मात्र सिमेंटच्या पाईपमध्ये मृतदेह आढळून आल्याने वाघाच्या मृत्यूबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केली होती तपासणी : तुमकूर जिल्ह्यातील जंगलात वाघांच्या अस्तित्वाची कोणतीच माहिती उपलब्ध नाही. मात्र या परिसरात एक चार वर्षाचा वाघ फिरत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणीही सुरू होती. जिल्ह्यात आतापर्यंत कधीही वाघ आढळून आला नाही. त्यामुळे वाघाचे अस्तित्व असल्याचा प्रश्नच नसल्याने वनविभागाचे अधिकारीही वाघाचा शोध घेत होते. मात्र तो आढळून आला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी : तुमकूर जिल्ह्यातील जंगलात वाघ मृतावस्थेत आढळल्याने नागरिकांमध्ये चांगलीच दहशत पसरली आहे. याबाबतची माहिती नागरिकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. मृत वाघ आढळल्याची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. याबाबत डॉक्टर घटनास्थळी येऊन वाघाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करतील. त्यानंतरच वाघाच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक अनुपमा यांनी दिली आहे. त्यामुळे वाघाच्या मृत्यूचे खरे कारण लवकरच स्पष्ट होईल.
हेही वाचा - Gemraram Returned To India : 28 महिन्यानंतर गेमराराम परतला भारतात, चुकून पाकीस्तानात गेल्यानंतर कारागृहात होता बंदी