इंदौर: लहान वयातच मुलांमध्ये कोणतीही गोष्ट लक्षात ठेवण्याची अद्भुत शक्ती असते असं म्हटले जाते. ही गोष्ट खरी केली आहे इंदूरमधील 3 वर्ष आणि 3 महिन्यांच्या वियांशी बाहेतीने. या चिमुरडीने लहान वयात हनुमान चालीसा तोंडपाठ करून जागतिक विक्रम केला आहे. नुकतेच वियांशीचे नाव लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि दिल्ली बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे.
आई-वडील म्हणायचे चालिसा : वियांशीचे वय अवघे 3 वर्ष 3 महिने आणि 25 दिवस असे आहे. या वयात तिने हनुमान चालीसा तोंडपाठ केली आहे. हनुमान चालिसा पाठ करणारी वियांशीही पहिली मुलगी ठरली आहे. वियांशीबद्दल माहिती देताना तिचे वडील अमित बाहेती म्हणाले की, धार्मिक शिक्षण देण्यासाठी आम्ही तिला सुरुवातीपासूनच धर्माशी जोडून ठेवले. आम्ही दोघे पती-पत्नी हनुमान चालिसाचे पठण करत असतो. वियांशीचे आई रोज संध्याकाळी चालिसाचे पठण करत असते. तर मी रोज सकाळी हनुमान चालिसाचे पठण करत असतो. एके दिवशी आम्ही पाहिले की, वियांशीने हनुमान चालिसाचा अर्धा भाग न पाहताच पाठ केला. त्यानंतर आम्ही तिला आणखी प्रोत्साहन दिले आणि लवकरच तिने संपूर्ण हनुमान चालीसा डोक्यात ठेवली आणि तोंडपाठ करून घेतली.
विक्रमाच्या यादीत नोंद : मित्रांच्या सांगण्यावरून, जेव्हा आम्हाला त्याच्या रेकॉर्डबद्दल माहिती मिळाली तेव्हा आम्हाला समजले की, एवढ्या लहान वयात असे करणारी वियांशी ही पहिलीच मुलगी आहे. यानंतर तिचे रेकॉर्डमध्ये नाव नोंदवून लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि दिल्ली बुक ऑफ रेकॉर्ड इंडियाच्या वतीने वियांशीला प्रमाणपत्र देण्यात आले. विक्रमाच्या नोंदीनुसार तेलंगणातील रहिवासी असलेल्या श्रीनिखा चिकलामेल्टाचा विक्रम मोडून वियांशीने हा नवा विक्रम केला आहे. श्रीनिखाने वयाच्या 3 वर्ष 4 महिने 28 दिवसात हा विक्रम केला होता. तर 3 वर्ष 3 महिने 25 दिवस वयाच्या वियांशीने हा विक्रम मोडीत काढला आहे.