नवी दिल्ली - दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट आली आहे, अशी कबुली आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली आहे. दिल्लीतील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता यावर शिक्कामोर्तब होत असल्याचे जैन म्हणाले. कोरोना रुग्णांसाठी खासगी हॉटेल्समधील बेड्स घेण्यासंदर्भात अद्याप सरकारची योजना नाही असेही जैन यांनी स्पष्ट केले. उत्सवकाळात दिल्लीतील कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली असल्याचेही ते म्हणाले. दिल्लीतील वाढते प्रदूषणसुद्धा चिंतेचा विषय ठरत आहे.
दरम्यान, शुक्रवारी दिल्लीत कोरोनाच्या ७ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. एका दिवसात इतके रुग्ण आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. शनिवारी ७९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या ४ महिन्यातील हा सर्वात मोठा मृत्यूदर आहे. राजस्थानातील डुंगरपूर दौऱ्यावर असताना जैन बोलत होते.
'दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णसंख्येकडे पाहल्यास लक्षात येते की ही कोरोनाची तिसरी लाट आहे. मात्र, रुग्णसंख्या लवकरच कमी होईल, असा विश्वासही जैन यांनी यावेळी व्यक्त केला.
१ मार्चला आढळला होता पहिला रुग्ण -
दिल्लीत कोरोनाचा पहिला रुग्ण १ मार्च रोजी आढळला होता. पूर्व दिल्लीतील एका व्यावसायिकाला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले होते. हा व्यावसायिक इटलीहून दिल्लीत परतला होता.
मास्क हे कोरोनावरील औषध - आरोग्यमंत्री
'दिल्ली सरकारने कोरोना चाचण्यांमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे रुग्णसंख्येतील वाढ दिसून येत आहे. कोरोनासंदर्भातील निष्काळजीपणासुद्धा याला कारणीभूत आहे. लोक तितके गांभीर्याने याकडे पाहत नाहीत. काय होते, असे म्हणत लोक मास्क वापरणे टाळत आहेत. हे पूर्णपणे चुकीचे आहे. कोरोनावर लस येईपर्यंत मास्क हेच कोरोनावरील औषध आहे, असेही जैन म्हणाले.
तिसरी लाटही लवकरच जाणार - केजरीवाल
शुक्रवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी बोलताना सांगितले की, पूर्वीच्या दोन्ही लाटांप्रमाणे कोरोनाची ही तिसरी लाटही लवकरच निघून जाईल. सर्व दिल्लीवासियांनी कोरोनासोबत लढण्यासाठी मास्क वापरावे. मास्क हे कोरोनावरील सध्याचे सर्वात प्रभावी औषध आहे. मास्क वापरण्यासाठीची मोहीम उघडणे गरजेचे आहे. सर्वांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे, असेही केजरीवाल म्हणाले.
दरम्यान, शनिवारी दिल्लीत कोरोनाच्या ६ हजार ९५३ रुग्णांची नोंद झाली आहे. सप्टेंबरपासून दिल्लीतील रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. गेल्या आठवड्यात रुग्णसंख्येत काही प्रमाणात घट झाल्याचे पाहायला मिळाले होते. दिल्लीत सध्या गृह विलगीकरणात (होम आयसोलेशन) २४ हजार १०० लोक आहेत.