बंगळुरू : कर्नाटकच्या बंदीपूरमध्ये असलेल्या नुगु वन्यजीव अभयारण्यात वाघाचे चार बछडे आढळून आले होते. यांपैकी दोन बछड्यांचा काल (सोमवार) मृत्यू झाला होता. तर, तिसऱ्या बछड्याचा आज उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे.
काल (सोमवार) सुरुवातीला तीन बछडे आढळून आले होते. त्यानंतर आणखी एक बछडा मिळाला. या सर्वांची प्रकृती उपासमारीमुळे अगदीच खालावली होती. त्यांना तातडीने उपचारांसाठी म्हसूरच्या प्राणीसंग्रहालयात पाठवण्यात आले होते. मात्र एका बछड्याचा रस्त्यात, तर दुसऱ्या बछड्याचा म्हैसूरमध्ये पोहोचल्यानंतर मृत्यू झाला होता. आज तिसऱ्या बछड्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, चौथ्या बछड्यावर उपचार सुरू असल्याची माहिती संग्रहालय प्रशासनाने दिली. या बछड्यांचा मृत्यू उपासमारीमुळेच झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालात निश्चित झाले. सध्या त्यांच्या आईचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वनअधिकाऱ्यांना जिथे हे बछडे आढळले होते, त्याठिकाणी वाघिणीच्या पावलांचे ठसे मिळाले आहेत. या भागात असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने आता तिचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती प्रोजेक्ट डिरेक्टर एस. आर. नटेश यांनी दिली.
हेही वाचा : खजिन्याच्या शोधात भुयार खोदताना गुदमरल्याने दोघांचा मृत्यू