हैदराबाद - तेलंगणाच्या आदिलाबाद शहरात 18 डिसेंबर रोजी मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एमआयएम) च्या नेत्याने केलेल्या गोळीबारात एकजण जखमी झाला होता. या व्यक्तीचा शनिवारी मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अदिलाबाद येथील टाटीगुडा येथील माजी नगरसेवक सय्यद जमीर (वय 52) यांनी हैदराबादच्या निजामच्या वैद्यकीय विज्ञान संस्थान (एनआयएमएस) मध्ये अखेरचा श्वास घेतला.
एमआयएमचे नेते मोहम्मद फारूक अहमद यांनी आपल्या परवानाधारक बंदुकीतून गोळीबार सुरू केला होता. त्यावेळी अदिलाबादच्या तातीगुडा भागात सय्यद जमीर आपला भाऊ सय्यद मन्नान आणि पुतण्या सय्यद मोहतेसिन यांच्यासह हल्ल्यात जखमी झाला. त्यांच्यावर चाकूनेदेखील हल्ला करण्यात आला होता. घटनास्थळी जमीर आणि मोहतेसिन यांना गोळ्या लागल्या तर मन्नानवर चाकूचे घाव बसले होते. यातील जमीरची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला हैदराबाद येथे उपचारासाठी नेण्यात आले.
क्रिकेट खेळताना झाला होता वाद
टाटीगुडा भागात क्रिकेट खेळणार्या दोन गटांत झालेल्या चकमकीत आदिलाबाद नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष मोहम्मद फारूक यांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांवर हल्ला केला होता. या हल्ल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये फारूख हे एका हातात बंदूक आणि दुसर्या हातात चाकू घेऊन हवेत गोळीबार करताना दिसत आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक करून हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. आता जमीरचा मृत्यू झाल्याने आरोपीविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला जाईल. आरोपीचा बंदूक बाळगण्याचा परवाना मागे घेण्याची शिफारसही पोलिसांनी जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे केली आहे.