पणजी (गोवा) - आपल्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत विद्यमान विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी पदाचा गैरवापर करून अवैद्य संपत्ती कमावली आहे. अशा अवैद्य संपत्तीवर नगर नियोजन खात्याकडून योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत भाजपचे मंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.
हेही वाचा - फडणवीसांच्या व्यूहरचनेपुढे महाविकास आघाडी सपशेल फेल, धनंजय महाडिक विजयी
2012 ते 22 या काळात भाजपच्या सरकारात मंत्री असताना मायकल लोबो यांनी आपल्या मंत्रिपदाचा दुरुपयोग करून कलंगुट, कांदळी या सागरी भागात अनेक अवैध संपत्ती, तसेच हॉटेल्सची निर्मिती केली आहे. अशा अवैद्य हॉटेलवर नगर नियोजन खात्याकडून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नगर नियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. तसेच, सत्तेचा वापर करून जर कोणतीही व्यक्ती आपल्या स्वार्थासाठी गोव्यात अवैद्य संपत्ती निर्माण करत असेल तर अशा अवैद्य संपत्तीला मी थारा देणार नाही, असे नगर नियोजन मंत्री विश्वजीत राणे म्हणाले.
विश्वजीत राणे हे स्वतःला राज्याचे मुख्यमंत्री समजतात, आपल्या पक्षश्रेष्ठींना खुश करण्यासाठी, तसेच मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी सुडापोटी ही कारवाई करत असून मी त्यांच्या कोणत्याही प्रतिक्रियेला उत्तर देणार नाही. त्यांची काम करण्याची पद्धत चुकीची असून, फक्त मला त्रास देण्यासाठी त्यांची ही कारवाई असल्याचे विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते मायकल लोबो यांनी सांगितले.
कोण आहेत मायकल लोबो? - मायकल लोबो हे सध्या गोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. 2012 - 2022 पर्यंत ते भाजप सरकारमध्ये मंत्री होते. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजप आमदारकीचा व मंत्रिपदाचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुख्यमंत्री पदाची आशा असलेले लोबो यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून विधानसभा निवडणुकीत आपली राजकीय ताकद वापरून आपल्या पत्नीसह आपल्या दोन समर्थक आमदारांना निवडून आणले होते. जर राज्यात काँग्रेसला बहुमताचा आकडा प्राप्त झाला असता तर मायकल लोबो हे मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार होते. मात्र, त्यांच्या या सर्व आकांक्षावर पुरते पाणी फिरले. सध्या ते विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत.
कारवाई मागील हे आहे कारण - 2022 च्या विधानसभा निवडणुकीत मायकल लोबो यांनी आपल्या पत्नीसाठी शिवली मतदारसंघातून तिकीट मागितले होते. मात्र, भाजपने त्याला सपशेल नकार दिला, तसेच इतर काही जागांवर आपले समर्थक उमेदवार उभे करण्याची मागणीही त्यांनी केली होती मात्र. भाजपा नेत्यांनी याला नकार दिला होता. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर लोबो यांनी आपल्या आमदारकीचा व मंत्रिपदाचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्या या काँग्रेस प्रवेशामुळे भाजपला राज्यात चार ते पाच ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे, भाजपच्या गोटात त्यांच्या विरोधात नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळेच त्यांच्यावर ही कारवाई केली जात असल्याचे बोलले जाते.
हेही वाचा - बिहारमधील पूर्णियात स्कॉर्पियोचा अपघात, ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू