नवी दिल्ली - दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या हिज्बुल मुजाहिदीन दहशतवादी संघटनेच्या हस्तकाला एनआयएकडून अटक करण्यात आली आहे. या हस्तकाकडून दहशतवाद्यांना रसद पुरवठाही होत असल्याचे तपासात समोर आले आहे. किश्तवारच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सुरक्षा रक्षकाची बंदूक हिसकावल्याप्रकरणी त्याच्या विरोधात आधीच गुन्हा दाखल आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने याबाबतची माहिती दिली.
पोलिसांची बंदूक पळवून नेणाऱ्यांना दिला होता आश्रय -
तारिख हुसेन गिरी असे अटक केलेल्या हिज्बुल मुजाहिदीन संघटनेच्या हस्तकाचे नाव आहे. किश्तवार जिल्ह्यातून त्याला अटक करण्यात आली. आरोपीला जम्मूमधील एनआएच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. पुढील चौकशीसाठी आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. जिल्ह्याधिकाऱ्यांच्या सुरक्षा रक्षकाची बंदूक हिसकावल्याप्रकरणी हुसेन गिरी विरोधात मार्च २०१९ ला गुन्हा दाखल झाला होता.
बंदूक पळवून नेण्याच्या चार घटना -
हिज्बुल मुजाहिदीन संघटनेचे दहशतवादी ओसामा बिन जावेद, हरुन अब्बास वाणी यांना मार्च २०१९ ला ताहिरने काश्मिर खोऱ्यात आश्रय दिला होता. या दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकाची बंदूक हिसकावली होती. नोव्हेंबर २०१८ ते सप्टेंबर २०१९ या दरम्यान, काश्मिरात बंदूक हिसकावण्याचे चार गुन्हे घडले होते. त्यापैकी ही एक घटना होती.