हैदराबाद : क्रिकेटवर सट्टा लावण्यास मज्जाव केल्यामुळे एका तरुणाने आपल्याच आईची आणि बहिणीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तेलंगणाच्या रावळकोले गावातील ही घटना आहे. साईनाथ रेड्डी असे या तरुणाचे नाव आहे.
तीन वर्षांपूर्वी वडील वारले..
साईनाथच्या वडिलांचा तीन वर्षांपूर्वी अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर सुनीता रेड्डी (४२) या आपला मुलगा साईनाथ आणि मुलगी अनुशासोबत राहत होत्या. त्या एका खासगी कंपनीत नोकरी करत होत्या, तर साईनाथ एम. टेक शिकत शिकत एका खासगी कंपनीत कामही करत होता. त्याची बहीण बी. फार्म करत होती. आपल्या पतीच्या मृत्यूनंतर मिळालेले विम्याचे २० लाख रुपये हे सुनीता यांनी जपून ठेवले होते.
साईनाथला लागला सट्ट्याचा नाद..
आयपीएल सुरू असताना साईनाथला सट्ट्याचा नाद लागला होता. यातच त्याने वडिलांच्या विम्यातून मिळालेल्या पैशांमधील मोठी रक्कम गमावली होती. तसेच, आईचे सुमारे १५० ग्रॅम सोन्याचे दागिनेही त्याने सट्ट्यात गमावले होते. या गोष्टींची माहिती मिळताच सुनीता आणि अनुशा यांनी त्याला जाब विचारत, सट्टेबाजी थांबवण्याची विनंती केली होती.
जेवणात मिसळले विष, आई म्हणाली डबा नको खाऊ..
यानंतर २३ नोव्हेंबरला साईनाथने घरातील जेवणात विषाच्या गोळ्या मिसळल्या, आणि तो कामाला निघून गेला. घरी आई आणि बहिणीने ते अन्न खाल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली. जेवणात काहीतरी चुकीचं असल्याचे समजताच, आईने साईनाथला फोन करुन डब्यातील जेवण टाकून देण्यास सांगितले. फोन झाल्यानंतर साईनाथ लगेच घरी गेला, मात्र आई आणि बहीण बेशुद्ध पडेपर्यंत त्याने त्यांना रुग्णालयात नेले नाही. त्यानंतर रुग्णालयात उपचारांदरम्यान २७ तारखेला अनुशाचा, तर २८ नोव्हेंबरला सुनीता यांचा मृत्यू झाला.
नातेवाईकांनी विचारल्यानंतर समोर आले सत्य..
यानंतर या दोघींच्या अंत्यसंस्कारावेळी नातेवाईकांनी खोदून-खोदून विचारल्यानंतर, साईनाथने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर नातेवाईकांच्या तक्रारीवरुन पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा : चारचाकी-बस अपघात, तिघांचा मृत्यू