बेंगळुरू TCS Bomb Threat : मंगळवारी (१४ नोव्हेंबर) सकाळी बेंगळुरूच्या इलेक्ट्रॉनिक सिटीमधील टीसीएस (TCS) कंपनीच्या ऑफिसला बॉम्बची धमकी देणारा फोन आला. याची माहिती तत्काळ परप्पाना अग्रहारा पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांचं श्वानपथक आणि बॉम्बशोधक पथक तेथे दाखल झालं. त्यांनी शोध घेतला असता, हा फेक कॉल असल्याचं निष्पन्न झालं.
कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यानं धमकी दिली : कंपनीच्या बी ब्लॉकमध्ये हा धमकीचा कॉल आला. या कॉलची माहिती मिळताच कंपनीच्या ऑफिसमध्ये एकच खळबळ उडाली होती. काही संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी तर सरळ इमारतीबाहेर धाव घेतली. यामुळे काही काळ कंपनीत चिंतेचं वातावरण होतं. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्यानं बॉम्बची धमकी दिल्याचं निष्पन्न झालं आहे.
कंपनीविरुद्धच्या रागातून हे कृत्य केलं : पोलीस तपासादरम्यान, कर्नाटकातील बेळगाव इथल्या एका माजी महिला कर्मचाऱ्यानं कंपनीविरुद्धच्या रागातून हे कृत्य केल्याचं समोर आलं. सध्या पोलीस बॉम्बचा बनावट कॉल करणाऱ्या या महिलेच्या शोधात आहेत. ही महिला यापूर्वी या कंपनीत नोकरी करत होती. मात्र पुढील शिक्षणासाठी तिनं नोकरी सोडली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिनं कंपनीला पुन्हा जॉईन करून घेण्याची विनंती केली. मात्र कंपनीनं असं करण्यास टाळाटाळ केली.
महिलेला ताब्यात घेण्यासाठी पथक रवाना : यामुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या या महिलेनं रागाच्या भरात हे पाऊल उचललं. श्वानपथक आणि बॉम्बशोधक पथकानं तपासणी केल्यानंतर हा फेक कॉल असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे. आता महिलेला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचं पथक बेंगळुरूहून बेळगावला रवाना झालं आहे.
हेही वाचा :
- Bomb Threat HC : आमच्या विरुद्ध निकाल दिला तर बॉम्बनं उडवू; नागपूर कोर्टाच्या न्यायाधीशांना धमकी
- Bomb threat call: दिल्लीहून पुण्याला येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी, विमानतळावर उडाला गोंधळ
- Mukesh Ambani Threat Case : क्रिकेटर शादाब खानच्या नावानं मुकेश अंबानींना धमकी, आरोपीला क्रिकेटच्या मैदानावर सुचली कल्पना