चेन्नई : तामिळनाडू विधानसभेत आज पट्टाली मक्कल काच (पीएमके) चे आमदार एस. पी. व्यंकटेश्वरन यांनी एक अजब मागणी केली. विधानसभेत बोलताना धर्मपुरी बमाका येथून विधानसभेचे सदस्य असलेले एस. पी. व्यंकटेश्वरन यांनी चेन्नई सुपर किंग्ज या आयपीएल संघावर बंदी घालण्याची मागणी केली. चेन्नईच्या टीममध्ये एकही तामिळनाडूचा खेळाडू नसल्याने या टीमवर बंदी घाला, अशी मागणी त्यांनी केली आहे.
'चेन्नई संघात एकही स्थानिक खेळाडू नाही' : विधानसभेत बोलताना आमदार एस. पी. व्यंकटेश्वरन म्हणाले की, 'तामिळनाडूमध्ये अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत. मात्र असे असूनही चेन्नई सुपर किंग्जने त्यापैकी एकाचीही निवड केली नाही. मात्र ते त्यांच्या संघाची तमिळनाडूचा संघ असल्याप्रमाणे जाहिरात करत आहेत. ते त्यातून प्रचंड व्यावसायिक नफाही कमावत आहेत. त्यामुळे माझी विनंती आहे की तामिळनाडू सरकारने या संघावर बंदी घालावी, ज्या संघामध्ये तामिळनाडूचा एकही खेळाडू नाही'.
मॅच पाहण्यासाठी आमदारांना मोफत पासची मागणी : एआयएडीएमकेचे आमदार आणि माजी मंत्री एस. पी. वेलूमणी यांनी चेन्नईत आयपीएलचे सामने पाहण्यासाठी सर्व आमदारांना मोफत पास देण्याची मागणी केली. एका चर्चेदरम्यान त्याला उत्तर देताना तामिळनाडूचे क्रीडा विकास मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी चेन्नईत आयपीएल सामने पाहण्यासाठी मोफत पास मागणाऱ्या एआयएडीएमके आमदाराला गृहमंत्री अमित शांहचे पुत्र आणि बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले.
चेन्नई सुपर किंग्जची टीम : या आयपीएलसाठी चेन्नई सुपर किंग्जची टीम पुढीलप्रमाणे आहे - ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, शेख राशिद, अंबाती रायुडू, सुभ्रांशू सेनापती, मोईन अली, निषांत सिंधू, बेन स्टोक्स, भगत वर्मा, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, ड्वेन प्रिटोरियस, मिशेल सॅंटनर, महेंद्र सिंह धोनी, डेवॉन कॉनवे, दीपक चहर, तुषार देशपांडे, आर. एस. हंगारगेकर, सिसांदा मागेला, अजय जादव मंडल, मथेषा पथिराना, सिमरजीत सिंह, प्रशांत सोलंकी, महेश तीक्ष्णा, आकाश सिंग.