चैन्नई - केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी पत्रकार परिषद घेत तामिळनाडूमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. तामिळनाडू राज्याचे राजकारण वेगळ्याच धाटणीचे आहे. गेल्या तीन दशकांमध्ये राज्यात फक्त प्रादेशिक पक्षांची चलती असून, राष्ट्रीय पक्षांना प्रादेशिक पक्षांच्या कुबडय़ा घेऊन राजकारण करावे लागते. तामिळनाडूत 234 जागांसाठी एकाच टप्प्यात 6 एप्रिलला मतदान होणार आहे. तर निकाल 2 मे रोजी लागेल. तामिळनाडूत सत्ता बनविण्यासाठी 118 चा जादूई आकडा आहे.
राज्यातील सध्याची परिस्थीती पाहता, द्रविड मुनेत्र कळघम (DMK) आणि अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (ADMK) दोन्ही पक्षांचे सर्वेसर्वा असणाऱ्या अनुक्रमे करुणानिधी आणि जयललिता या दोन मोठ्या नेत्यांचं निधन झालेलं आहे. जयललिता किंवा करूणानिधी यांच्याशिवाय होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक असणार आहे. राज्यात आपले पाय घट्ट रोवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नोव्हेंबर महिन्यात तामिळनाडूचा दौराही केला होता. 14 जानेवरील पोंगल उत्सवासाठी तामिळनाडूमध्ये भाजपाने मोठा कार्यक्रम आयोजित केला होता.
राज्यात भाजपचं अस्तित्व नाही. परंतु, भाजपाचा एआयएडीएमकेसोबत युती करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जयललिता यांची मैत्रीण शशिकला यांनी सारी सूत्रे हाती घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी तुरुंगाची हवा खावी लागली 27 जानेवारी रोजी शशिकला या चार वर्षांची शिक्षा भोगून तुरुंगातून आल्या आहेत. रुग्णालयातून आल्यावर शशिकला या एआयएडीएमकेमध्ये सामिल होणार की स्वत:चा एएमएमके पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सत्तरच्या दशकापासूनच तामिळनाडूत कोणत्याही मोठ्या राष्ट्रीय पक्षाला पाय रोवता आलेले नाहीत.
द्रमुक, अण्णा द्रमुक, काँग्रेस, भाजपासह कमल हसन ही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 'मक्कल निधी मय्यम', हा कमल हसन यांचा पक्ष आहे. दक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत राजकारण प्रवेश करणार होते. मात्र, प्रकृती अस्वस्थामुळे त्यांनी राजकारणात प्रवेश करणार नसल्याची घोषणा केली होती. नेते कमल हासन (मक्कल निधी माईम पक्षाचे अध्यक्ष) आणि रजनीकांत हे तमिळनाडूच्या कल्याणासाठी एकत्र येऊन काम करणार होते. मात्र, रजनीकांत यांच्या राजकारणात न उतरण्याच्या निर्णयावर कमल हसन नाराजी व्यक्त केली होती.
2016 ची विधानसभा निवडणूक -
16 मे 2016 रोजी एकाच फेरीत घेण्यात आलेल्या तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व 234 जागांसाठी नवे आमदार निवडले गेले. जयललिताच्या नेतृत्वाखालील अण्णा द्रमुक पक्षाने 136 जागांसह बहुमत मिळवून सत्ता राखली. दर पाच वर्षांनी सत्तांतरण होणाऱ्या तमिळनाडूमध्ये सत्ताधारी राजकीय पक्षाने बहुमत राखल्याची 1984 नंतर ही पहिलीच वेळ होती. द्रमुक पक्षाने मागील निवडणुकीच्या तुलनेत चांगले प्रदर्शन केले परंतु बहुमत मिळवण्यात द्रमुकला अपयश आले. अम्मा जयललिता ह्यांनी लढवलेली ही अखेरची निवडणूक होती. डिसेंबर 2016 मध्ये आजारपणामुळे जयललिता ह्यांचे निधन झाले. त्यानंतर पन्नीरसेल्वम हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनले. मात्र, त्यानंतर पुन्हा पन्नीरसेल्वम यांना हटवत पलानीस्वामी मुख्यमंत्री झाले.