जयपूर : राजस्थानच्या जालोर जिल्ह्यामध्ये कडाक्याच्या उन्हामुळे आणि पाणी न मिळाल्याने एका पाच वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. यासोबतच एक वृद्ध महिलाही बेशुद्ध होऊन पडली होती. स्थानिकांनी याबाबत माहिती दिल्यानंतर रानीवाडा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी एका खासगी वाहनाच्या मदतीने बेशुद्ध असणाऱ्या वृद्धेला सार्वजनिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल केले. या वृद्धेवर सध्या उपचार सुरू आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ही वृद्धा आणि पाच वर्षांची मुलगी रायपूर गावातून चालत रोडा गावाकडे निघाल्या होत्या. यावेळी बराच वेळ पाणी न मिळाल्यामुळे, तसेच उन असह्य झाल्याने वृद्धा जागीच बेशुद्ध झाली. तसेच, तिच्यासोबत असलेल्या मुलीचाही तिथेच मृत्यू झाला. या महिलेचे नाव सुकी देवी भील असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
याप्रकरणी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गहलोत सरकार, तसेच राहुल आणि सोनिया गांधींवर निशाणा साधला आहे. जावडेकर यांनी ट्विट करत ही घटना निंदनीय असल्याचे म्हटले आहे. तसेच, कर्नल राज्यवर्धन सिंह राठौड यांनी या घटनेला राजस्थान सरकारचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा : म्यूकरमायकोसिसचा डोळ्यांवर गंभीर परिणाम; कशामुळं अन् कोणाला होतो; काय काळजी घ्यावी?