कुलगाम (जम्मू काश्मीर) - जिल्ह्यातील सुरांदू कुलपोरा भागात एका उपसरपंचावर संशयित अतिरेक्यांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. उपसरपंचाला जवळच्या रुग्णालयात नेले असता तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. मोहम्मद याकूब दार, असे उपसरपंचाचे नाव आहे. मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलाने परिसराची नाकेबंदी केली आहे.
आज सायंकाळी 8.45 ला पोलिसांना कुलपोरा भागात दहशतवादी घटना घडल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर वरिष्ट पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. मोहम्मद दार याच्यावर अतिरेक्यांनी गोळीबार केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.
दार हे गोळीबारात गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास चालू आहे.
हेही वाचा - Operation Ganga : भारताने 24 तासांत युक्रेनमधून 1300 लोकांना बाहेर काढले