प्रयागराज : 'ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे..तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे', हे सिनेमातले गाणे तुम्ही ऐकलेच असेल. पण अशी खऱ्या आयुष्यातील मैत्री तुम्ही कधी पाहिली आहे का? उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मध्ये असाच काहीसा प्रकार घडला आहे! (story of two friends in prayagraj) इथे दोन मित्रांनी शेवटपर्यंत एकमेकांची साथ सोडली नाही.
थरवईच्या टिटिमपुर येथील रहिवासी मसुरियादीन यादव आणि राम कृपाल यादव हे जवळचे मित्र होते. मसुरियादीन याचे गुरुवारी निधन झाले. मित्र राम कृपालला याची माहिती मिळताच तो थेट मसुरियादीनच्या घरी गेला. आपल्या मित्राचा मृत चेहरा पाहून त्याने रडत देवाकडे स्वतःचे मरण मागितले. इतके बोलताच त्याचाही श्वास थांबला. तिथे उपस्थित लोकांना काही समजे पर्यंत राम कृपाल याने जगाचा निरोप घेतला. (two friends died together in Prayagraj).
आयुष्यातील 70 वर्षे एकत्र : राम कृपाल आणि मसुरियादीन लहानपणापासूनच घट्ट मित्र होते. दोघेही दिवसभर एकत्र घालवायचे. ते त्यांच्या घरी फक्त झोपायला जायचे. ते लहानपणी एकत्र खेळायचे, तर तरुणपणात देखील त्यांनी एकत्र काम केले. म्हातारपणी दोघेही देवळात आणि तीर्थक्षेत्रांना दर्शन आणि पूजेसाठी एकत्र जात असत. अशा प्रकारे राम कृपाल आणि मसुरियादीन यांनी त्यांच्या आयुष्यातील 70 वर्षे एकत्र राहून घालवली. वयाच्या शेवटच्या टप्प्यात दोघेही मित्र एकत्र मरण्याबद्दल बोलत असत.
मित्राच्या मृतदेहाला मिठी मारून दिला जीव : गुरुवारी दिवसा मसुरियादीनचा आजारपणामुळे मृत्यू झाला. मित्राच्या मृत्यूचा राम कृपालला धक्का बसू नये म्हणून कुटुंबीयांनी याची माहिती लगेच दिली नाही. तो जेव्हा त्याच्या मित्राला भेटण्यासाठी घरी पोहोचला तेव्हा त्याला त्याचा मृत्यू झाल्याची माहिती कळली. रामने कृपालचा चेहरा पाहताच त्याने त्याच्या मृतदेहाला मिठी मारली. यानंतर आरडाओरडा करत त्याने आपल्या मित्रासह त्यालादेखील या जगातून घेऊन जाण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली. काही क्षणांतच राम कृपालचा श्वासही थांबला.
दोघांचा अंत्यसंस्कार एकत्र होऊ शकला नाही : दोघे ज्या प्रकारे एकत्र जीवन जगले त्याचप्रमाणे त्यांनी एकत्र मृत्यूलाही कवटाळले. दोन्ही मित्रांचे अंत्यसंस्कारही एकत्रच करण्यात यावेत आणि त्यांची अंत्ययात्राही एकत्रच काढण्यात यावी, अशी गावकऱ्यांची इच्छा होती. मात्र मसुरियादीनचा मुलगा दुसऱ्या राज्यात राहत होता. त्यामुळे गुरुवारी राम कृपाल याच्यावर तर शुक्रवारी मसुरियादीनचा अंत्यसंस्कार करण्यात आला.