बिलासपूर : छत्तीसगडच्या बिलासपूरमधील केके श्रीवास्तव आणि त्यांचे कुटुंबीय गेल्या 20 वर्षांपासून दररोज नित्यनेमाने आपल्या घरावर तिरंगा फडकावत आहेत. राष्ट्रध्वजास सलामी देत दररोज राष्ट्रगीत म्हणण्याचा नित्यक्रमही श्रीवास्तव कुटुंबीय चुकवत नाहीत. त्यांच्या या देशभक्तीच्या सातत्याची गोल्डन बूक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंद झाली आहे.
2002 पासून जपली परंपरा
केके श्रीवास्तव हे बिलासपूरमधील नेहरू नगरमध्ये राहतात. ते निवृत्त प्राध्यापक आहेत. 2002 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने घर आणि कार्यालयांमध्ये नियमितपणे राष्ट्रध्वज फडकाविण्यास मान्यता दिल्यानंतर श्रीवास्तव यांनी आपल्या घरावर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकाविण्यास सुरूवात केली. तेव्हापासून ते आजतागायत ही परंपरा त्यांनी कायम ठेवली आहे. त्यांचे कुटुंबीयही ही परंपरा अगदी तन्मयतेने जपतात.
शालेय जीवनातील घटनेचा परिणाम
शाळेत असताना राष्ट्रध्वजाच्या सावलीत उभे राहण्यास एका शिक्षकाने श्रीवास्तव यांना मनाई केली होती. मात्र यानंतरही श्रीवास्तव तिथून हटले नाही. तेव्हा शिक्षकाने त्यांना धक्का देऊन तिथून बाजूला केले. याचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला आणि त्यांनी एक दिवस राष्ट्रध्वज फडकाविण्याचा निश्चय केला. यापूर्वी ते नोकरीदरम्यान शासकीय कार्यालयात राष्ट्रध्वज फडकावित होते.
श्रीवास्तव कुटुंबातही देशप्रेमाची रुजवण
श्रीवास्तव यांच्या मनातील देशप्रेमाची भावना सर्व कुटुंबीयांमध्ये चांगलीच रुजली आहे. श्रीवास्तव यांची एक मुलगी श्वेता दिल्लीत डॉक्टर आहे, तर दुसरी मुलगी वीज वितरण विभागात आहे. तर मुलगा आयआयटीमध्ये आहे. या सर्वांच्या मनातही देशप्रेमाची भावना खोलवर रुजली आहे.
गोल्डन बूक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंद
श्रीवास्तव यांच्या या देशप्रेमाच्या सातत्याची गोल्डन बूक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंद झाली आहे. श्रीवास्तव यांच्या ध्वजारोहणाच्या सातत्याविषयी माहिती मिळाल्यानंतर गोल्डन बूक ऑफ रेकॉर्डने स्वतःहून त्यांना संपर्क करत त्यांचे नाव नोंदवून घेतले. श्रीवास्तव याचे श्रेय आपल्या कुटुंबीयांनाच देतात.
शेजारीही करतात सहकार्य
श्रीवास्तव यांचे शेजारीही त्यांना सहकार्य करतात. असा एकही दिवस नाही जेव्हा श्रीवास्तव यांच्या घरावर राष्ट्रध्वज फडकत नाही असे त्यांचे शेजारी आवर्जुन सांगतात. तिन्ही ऋतुंतही श्रीवास्तव यांच्या घरावर राष्ट्रध्वज डौलाने फडकताना दिसतो असे शेजारी सांगतात.
श्रीवास्तव यांचे कार्य प्रेरणादायी
श्रीवास्तव यांच्या देशप्रेमातून सर्वांनीच शिकवण घेण्याची गरज आहे. देशभक्ती केवळ दोन राष्ट्रीय सणांपुरतीच मर्यादीत न राहता ती दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनली पाहिजे असेच मत अनेक जण यावरून व्यक्त करताना दिसत आहेत. श्रीवास्तव यांचे कार्य खरोखरच सर्वांसाठी प्रेरणादायक आहे असेच मत अनेक जण नोंदविताना दिसत आहेत.
हेही वाचा - स्वातंत्र्यदिन दोन दिवसांवर असताना दिल्ली पोलिसांची कारवाई; चार जणांकडून 55 पिस्तुलांसह 50 काडतूस जप्त