इरोड (तामिळनाडू): आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचे बुधवारी सकाळी तामिळनाडूमधील इरोड येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. हेलिकॉप्टर इरोड जिल्ह्यातील सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्पातील (STR) आदिवासी वस्ती असलेल्या उकिनियम येथे उतरवण्यात आले. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागल्याचे सांगण्यात येत आहे. रविशंकर यांच्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये आणखी तीन जण होते. त्यामध्ये दोन सहाय्यक आणि एक पायलट यांचा समावेश आहे. हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुरक्षित आहेत.
खराब हवामानामुळे आपत्कालीन लँडिंग: मिळालेल्या माहितीनुसार, श्री श्री रविशंकर एका खासगी हेलिकॉप्टरने बेंगळुरूहून तिरुपूरला जात होते. कदंबूरचे पोलीस निरीक्षक सी वादिवेल कुमार यांनी सांगितले की, सकाळी १०.१५ वाजता हेलिकॉप्टर एसटीआरवरून जात असताना, खराब हवामानामुळे वैमानिक पुढे जाऊ शकला नाही. त्यांनी सांगितले की, या कारणास्तव पायलटने हेलिकॉप्टरचे या ठिकाणी आपत्कालीन लँडिंग केले. त्याच वेळी, हवामान स्वच्छ झाल्यानंतर 50 मिनिटांनी हेलिकॉप्टरने पुन्हा उड्डाण केले.
एक तासानंतर पुन्हा उड्डाण: तामिळनाडू पझांगुडी मक्कल संगमचे राज्य कोषाध्यक्ष के रामास्वामी हे सीपीआयचे माजी आमदार पीएल सुंदरम यांच्या विनंतीवरून उकिनियाम गावात पोहोचले. त्यांनी सांगितले की, ते घटनास्थळी पोहोचेपर्यंत हेलिकॉप्टरला पुढे जाण्याची परवानगी मिळाली होती. हेलिकॉप्टर त्या गावात सुमारे एक तास थांबले आणि त्यानंतर सकाळी 11.30 च्या सुमारास तिरुपूरच्या दिशेने प्रवास सुरू झाला.
आर्ट ऑफ लिव्हिंगचे निवेदन: आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनने घटनेनंतर एक निवेदन प्रसिद्ध केले. त्यात म्हटले आहे की, श्री श्री रविशंकर एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी बेंगळुरू ते कांगेयमला जात होते. ते तिरुपूर जिल्ह्यातील श्री बृहन्नायकी अंबिका समेथा श्री आंध्र कपालेश्वर स्वामी मंदिरात कुंभभिषेकम येथे जात असताना ही घटना घडली. प्रतिकूल हवामानामुळे वैमानिकाने उगिनियम येथे मध्यंतरी थांबण्याचा निर्णय घेतला. गुरुदेव आणि इतर पूर्णपणे सुरक्षित आहेत. यानंतर गुरुदेव कार्यक्रमाला पोहोचले आणि त्यांनी त्यांच्या पुढील कार्यालाही सुरुवात केली.
एक तास स्थानिकांशी संवाद: श्री श्री रविशंकर हेलिकॉप्टर थांबल्यावर त्यांच्या अनुयायांसह बाहेर उभे राहिले. त्यांनी तेथे जमलेल्या स्थानिकांशी संवाद साधला. त्यांचे खाजगी हेलिकॉप्टर सकाळी साडेदहाच्या सुमारास कदंबूर परिसरातील ओक्कियम सरकारी शाळेच्या क्रीडांगणावर उतरले होते. एक तास स्थानिकांशी संवाद साधल्यानंतर, रविशंकर हे तिरुपूर जिल्ह्यातील कांगेयम येथे त्यांच्या पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले.