कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सत्तेत येण्यासाठी पक्षांकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. तृणमूल काँग्रेस, भाजपा आणि काँग्रेस-डाव्या पक्षांची युती यांच्यात लढत होणार आहे. शुक्रवारी काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जारी केली आहे. पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांना यादीत स्थान देण्यात आले आहे. तर पक्षाच्या नेतृत्वाविरोधात आवाज उठवणाऱ्या जी-23 नेत्यांचा या यादीत समावेश नाही.
स्टार प्रचारकांच्या यादीत हंगामी पक्षाध्याक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग, काँग्रेस खासदार राहुल गांधी, प्रियांका गांधी, सचिन पायलट, नवज्योत सिंह सिद्धू, अभिजीत मुखर्जी, अशोक गेहलोत, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि भूपेश बघेल आदी नावे आहेत. आतापर्यंत काँग्रेसकडून बंगालमध्ये प्रचाराचे नारळ फोडण्यात आलेले नाही.
स्टार प्रचारकांच्या यादीत काँग्रेसमधील ज्येष्ठांचा असंतुष्ट गट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'जी-23' नेत्यांचा समावेश नाही. पाच राज्यात होणाऱ्या निवडणुकीमध्येही या नेत्यांना विशेष महत्त्व देण्यात आले नाही. दरम्याना, पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने डाव्या पक्षांशी युती केल्यानंतर जी-23 नेत्यांच्य गटातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते आनंद शर्मा यांनी आक्षेप घेतला होता. यावरून काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी आणि आनंद शर्मा यांच्यात टि्वटरवॉर पाहायला मिळाला होता.
काँग्रेस उमेदवारांचीही पहिली यादी -
काँग्रेसनंही 13 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसचे 5 उमेदवार हे पहिल्या टप्प्यात तर अन्य 8 उमेदवार दुसऱ्या टप्प्यात लढतील. राज्यात काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी युती केली आहे.
प. बंगालमध्ये राजकीय स्थिती काय?
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा आहेत. याठिकाणी बहुमतासाठी 148 आमदारांच्या संख्याबळाची गरज आहे. सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षाला अथवा राजकीय आघाडीकडे 148 जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे. या निवडणुकीत भाजप विरुद्ध तृणमूल असा अटीतटीचा सामना पाहायला मिळणार आहे. गेली निवडणूक 2016 मध्ये पार पडली होती. 2016 सालच्या विधानसभा निवडणुकांवेळीही डावे पक्ष आणि काँग्रेस एकत्र लढले होते. दरम्यान, 2016 च्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेस-डाव्यांच्या युतीला 294 जागांमधील 76 जागा मिळाल्या होत्या.
हेही वाचा - 'करवे' कार्यकर्त्यांनी मराठी फलकांना फासले काळे; गाड्यांवरील मराठी नंबरप्लेटही काढल्या