नवी दिल्ली- काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रमुख व राज्य प्रभारींची २४ जूनला सकाळी साडेदहा वाजता बैठक बोलाविली आहे. ही बैठक ऑनलाईन होणार आहे. यामध्ये कोरोना, पेट्रोल-डिझेलचे दर, अर्थव्यवस्था आदी मुद्द्यावर चर्चा केली जाणार आहे.
प्रदेश काँग्रेस कमिटी प्रमुखांच्या बैठकीत सरकारविरोधात आंदोलन करण्याकरिता नियोजनावर चर्चा केली जाणार आहे. सरकारचे उपाय सूचविणे आणि सरकारच्या अपयशाची माहिती लोकापर्यंत पोहोचविण्याबाबत बैठकीत चर्चा केली जाणार असल्याचे सूत्राने सांगितले.
हेही वाचा-The Great Khali ची आई टांडी देवी यांचे निधन, कोरोना रिपोर्ट आला होता निगेटिव्ह
या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता
काँग्रेसच्या बैठकीत देशातील सध्याच्या राजकीय व आर्थिक स्थितीबाबत चर्चा होणार आहे. मनीष तिवारी आणि शत्रुघ्न सिन्हा हे राष्ट्रमंचमध्ये आहेत. मात्र, ते वैयक्तिक कारणामुळे बैठकीत उपस्थित राहणार नाहीत. दुसरीकडे कॅप्टन अमरिंदर सिंग हे तीन सदस्यीय समितीची उद्या सकाळी अकरा वाजता बैठक घेण्याची शक्यता असल्याचे सूत्राने सांगितले.
हेही वाचा-नवं लसीकरण धोरण : कुणाला मिळणार मोफत लस; खासगी रुग्णालयात घेतल्यास किती लागणार पैसे?
लोकसभेच्या पावसाठी अधिवेशनापूर्वी बैठकीचे आयोजन-
जुलैमध्ये लोकसभेचे पावसाठी अधिवेशन होणार आहे. त्यामुळे ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. यापूर्वी काँग्रेसने नवीन कृषी कायद्याला विरोध करत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. काँग्रेसने कोरोनाचा प्रश्न हाताळणी आणि मंदगतीने लसीकरण या विषयांवरून मोदी सरकारवर सातत्याने टीका केली आहे.
प्रशांत किशोर यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतली भेट
निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी सोमवारी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. यापूर्वीही दोघांची शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट झाली होती. आता पुन्हा दोघांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ असून अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. आगामी उत्तर प्रदेश राज्यातील विधानसभा निवडणूक आणि 2024 लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून या बैठकीकडे पाहिले जात आहे. दरम्यान, उद्या (मंगळवार) दुपारी 4 वाजता 15 राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत शरद पवार बैठक घेणार आहेत. यात सध्याची राजकीय आणि आर्थिक स्थितीवर सर्वांगिण चर्चा होणार असल्याचे वृत्त आहे. या बैठकीला मनिष तिवारी आणि शत्रुघ्न सिन्हा उपस्थित राहण्याची शक्यता नाही. खासगी कामामुळे बैठकीला उपस्थित राहता येणार नाही, असे त्यांनी कळविल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.