गुवाहाटी : आसाममध्ये या महिनाअखेरीस विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे. यासाठी सर्व पक्षांनी प्रचार सुरू केला असून, भाजपाच्या प्रचारासाठी स्मृती इराणी शनिवारी आसाममध्ये दाखल होणार आहेत. यापूर्वी काँग्रेसच्या प्रचारासाठी प्रियांका गांधींचा दौरा याठिकाणी पार पडला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाच्या स्टार प्रचारक स्मृती इराणी या मरियानी, शिवसागर आणि समगुरी मतदारसंघांमधील उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यात येणार आहेत. मरियानी मतदारसंघातून रमानी तंटी, तर शिवसागर मतदारसंघातून सुरभी राजकोवारी या निवडणूक लढवणार आहेत. समगुरी मतदारसंघातून अनिल सैकिया हे भाजपाचे उमेदवार आहेत. समगुरी येथे २००१पासून काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे.
तीन टप्प्यांमध्ये होणार निवडणूक..
आसाममध्ये 126 विधानसभा मतदारसंघासाठी तीन टप्प्यात मतदान होणार. पहिला टप्पा 27 मार्च, दुसरा टप्पा 1 एप्रिल आणि तिसरा टप्प्यातील मतदान 6 एप्रिलला पार पडेल. सध्या आसाममध्ये भाजपा सत्तेत असून काँग्रेसने ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रँटशी आघाडी केली आहे.
भाजपापुढे सत्ता राखण्याचे आव्हान..
काँग्रेस राज्यात कमी पडली असली, तरी भाजपाला यावेळी सत्ता मिळवणे कठिण असल्याचे चित्र आहे. आसाममध्ये धार्मिक बहुलता आहे. एनआरसी आणि सीएए कायद्यांमुळे भाजपापुढे एक आव्हान निर्माण झाले आहे. या कायद्यांविरोधात आसाममध्ये मोठे आंदोलन झाले होते. मात्र, सत्ता कायम राखण्यासाठी भाजपाचे जोरात प्रयत्न सुरु आहेत.
हेही वाचा : पाच राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम, वाचा सविस्तर...