पणजी - मडगाव कुंकल्ली येथे एक वर्कशॉपला रविवारी पहाटे आग लागली होती, या आगीत 7 गाड्या जळून खाक झाल्या असून सुमारे तीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशामक दलाच्या जवानांनी दिली आहे. तर अन्य चार गाड्या वर्कशॉपमधून काढण्यात दलाला यश आले. आग लागण्याचे नेमके कारण समजू शकले नाही.
आगीचे कारण अस्पष्ट
रविवारी पहाटे कुंकल्ली येथील एसकेबी वर्कशॉपला आग लागली होती. या आगीत सात गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडून तीस लाख रुपयांचे नुकसान झाले. अन्य चार गाड्या अन्यत्र हलविण्यात आल्या होत्या. दरम्यान, आगीचे नेमके कारण समजू शकले नसल्याची माहिती अग्निशामक दलाच्या जवानांनी दिली.
आग विझवण्यात अडथळे
पहाटे पाच वाजता आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या, मात्र आगीची तीव्रता जास्त असल्यामुळे आग विझवण्यात अडथळे निर्माण झाले होते, ही आग आटोक्यात आणण्यासाठी दोन तास लागले.
अचानक आग लागल्याने तारांबळ
पहाटेच्या सुमारास सगळे साखरझोपेत असताना अचानक लागलेल्या आगीमुळे सर्वत्र तारांबळ उडाली होती, आगीचे नेमके कारण न समजल्याने हा घातपात आहे, की अन्य काय कारण याचा तपास सुरू आहे.