भोपाळ (मध्य प्रदेश) - कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत आहे. कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी मध्यप्रदेश सरकारने अनोखी शक्कल लढवली आहे. लोकांनी मास्कचा वापर करावा, सुरक्षित अंतरासह कोरोनाच्या नियमांचे पालन व्हावे, यासाठीचा संकल्प करण्यासाठी मंगळवारी भोंगा वाजवला जाणार आहे. सरकारच्या या निर्णयावर काँग्रेसकडून मात्र टीका करण्यात येत आहे.
इंदूर, भोपाळ आणि जबलपूरमध्ये टाळेबंदी आहे. कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. शनिवारी 1332 रुग्णांची नोंद झाली. अनेक जिल्ह्यांमध्ये संसर्ग झपाट्याने पसरत असून त्याला रोखणे आवश्यक आहे. टाळेबंदी करून मी आर्थिक व्यवहारांमध्ये व्यत्यय आणू इच्छित नाही, तशी माझी इच्छा नाही, परंतु कोरोनाचा वाढता वेग मनामध्ये चिंता निर्माण करत आहे. कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. या लढाईमध्ये आम्हाला जनतेच्या सहकार्याची गरज आहे. सहकार्य फक्त इतकेच हवे आहे की, सर्वांनी मास्क वापरावेत आणि कोरोना नियमांचे पालन करावे.
सर्व शहरांमध्ये भोंगा वाजणार
23 मार्च रोजी सकाळी 11 वाजता मध्य प्रदेशातील सर्व शहरांमध्ये भोंगा वाजवला जाईल. त्यावेळी लोकांनी जेथे असेल तेथे दोन मिनिटे उभे राहून मास्क घालण्याचा आणि सुरक्षित अंतर ठेवण्याचा संकल्प करावा. दुकानदारांनी त्यांच्या दुकानांसमोर सुरक्षित अंतर राहण्यासाठी गोल आखून द्यावेत, अशी मी त्यांना विनंती करतो. मी स्वत: असे गोल आखून देण्यासाठी बाहेर पडेन. याप्रकारेच त्यादिवशी सायंकाळी सात वाजताही दोन मिनिटांसाठी भोंगा वाजवला जाईल. त्यावेळी सर्वांनी पुन्हा खात्री करावी की, आपण आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांनी मास्क घातला आहे की नाही. मास्कचा वापर करणे फार गरजेचे आहे, यासाठी आम्ही ही संकल्प मोहीम सुरू करत आहोत. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच आपण काळजी घ्यायला पाहिजे, असे मुख्यमंत्री शिवराजसिंह यांनी सांगितले.
थाळ्या-टाळ्या वाजवणे कमी होते की काय?
यावर विरोधी काँग्रेस पक्षाकडून टीका करण्यात येत आहे. थाळ्या-टाळ्या वाजवणे हे काय कमी पडेलेले म्हणून की काय यांना आता भोंगा वाजवणे सुचले आहे. जीव मुठीत घेऊन काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना तुम्ही पगार देऊ शकत नाहीत, वर त्यांना मारहाण केली जाते. या भोंगा वाजवण्याने नेमके काय होणार आहे? ते मुख्यमंत्र्यांनी सांगावे, असे म्हणत माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अरुण यादव यांनी याप्रकारावर टीका केली आहे.