बंगळुरू : गेल्या अनेक दिवसापासून कर्नाटक मुख्यमंत्री पदावरुन पेच निर्माण झाला आहे. मात्र आता हा पेच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मोठ्या शिताफीने सोडवला आहे. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी सिद्धरामय्या यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ टाकली आहे. त्यामुळे कर्नाटकच्या राजकारणात उठलेले वादळ आता शांत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सिद्धरामय्या हे कर्नाटक काँग्रेसमधील स्वच्छ प्रतिमेचे नेते म्हणून गणले जातात. त्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदावर त्यांचा दावा करण्यात येत होता.
स्वच्छ प्रतिमेचे काँग्रेस नेते : सिद्धरामय्या हे कर्नाटकातील स्वच्छ प्रतिमेचे काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून देशभर ओळखले जातात. त्यांच्यावर आतापर्यंत कोणतेही आरोप करण्यात आलेले नाही. त्यामुळे कर्नाटकच्या जनतेत त्यांच्याविषयी आदर आहे. नागरिकांच्या मनावर सिद्धरामय्या यांची पकड असल्याने जनतेनेही त्यांना मुख्यमंत्री पदाचा प्रमुख दावेदार म्हणून स्वीकारले आहे. त्यामुळे कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत प्राप्त झाल्यानंतर सिद्धरामय्या यांनाच मुख्यमंत्री पदावर आरुढ करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती.
ही सिद्धरामय्या यांची शेवटची निवडणूक : कर्नाटक काँग्रेसमध्ये सिद्धरामय्या यांचा चांगलाच दबदबा आहे. त्यांची जनमाणसात चांगलीच पकड आहे. कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी भाजपला हरवण्यात मोलाची भूमिका पार पाडली आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीत मुद्देसूद प्रचार करत भाजप नेत्यांवर 40 टक्के हप्तेखोरीचा आरोप केला. त्याचे परिणाम भाजप भोगत आहे. कर्नाटकच्या राजकारणात चांगली पकड असतानाही सिद्धरामय्या यांनी ही त्यांची शेवटची निवडणूक असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे त्यांच्या राजकारणातून निवृत्त होण्याच्या वक्तव्याने चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता.
गरीब शेतकरी कुटूंबात जन्म : सिद्धरामय्या यांचा जन्म 12 ऑगस्ट 1948 रोजी म्हैसूर जिल्ह्यातील वरुणा होबळी येथील सिद्धरामन हुंडी या दुर्गम गावात झाला. सिद्धरामय्या गरीब शेतकरी कुटूंबातून आले आहेत. ग्रामीण कुटुंबातून आलेले सिद्धरामय्या हे त्यांच्या कुटुंबातील पहिले व्यक्ती होते, ज्यांनी म्हैसूर विद्यापीठातून बीएस्सीची पदवी घेतली. नंतर त्यांनी म्हैसूर विद्यापीठातून कायद्याची पदवी घेऊन काही काळ वकिली व्यवसाय केला. सिद्धरामय्या त्यांच्या विद्यार्थीदशेत वक्तृत्व कौशल्यासाठी ओळखले जात होते. डॉ राम मनोहर लोहिया यांनी मांडलेल्या समाजवादाचा त्यांच्यावर प्रभाव होता. दलित आणि समाजातील दुर्बल घटकांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश केला.
1983 मध्ये झाले आमदार : सिद्धरामय्या यांनी भारतीय लोक दल पक्षाकडून 1983 निवडणूक लढवून आमदार झाले. म्हैसूर जिल्ह्यातील चामुंडेश्वरी विधानसभा मतदार संघातून त्यांनी 7 व्या कर्नाटक विधानसभेत प्रवेश केला. नंतर त्यांनी सत्ताधारी जनता पक्षात प्रवेश केला. ते कन्नड प्रहारी समितीचे (कन्नड कवलू समिती) पहिले अध्यक्ष आहेत. त्याची स्थापना कन्नडला अधिकृत भाषा म्हणून करण्याच्या अंमलबजावणीवर देखरेख करण्यासाठी करण्यात आली होती. राज्याच्या कन्नड भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी त्यांनी प्रयत्न केले.
अनेक मंत्रालयाचा संभाळला कार्यभार : सिद्धरामय्या यांना रेशीम राज्यमंत्री पदावर नेमण्यात आले. रेशीम विभाग आणि रेशीम उद्योगाच्या सर्वांगीण विकासात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 1985 च्या मध्यावधी निवडणुकांदरम्यान सिद्धरामय्या त्याच मतदार संघातून 8 व्या कर्नाटक विधानसभेसाठी पुन्हा निवडून आले. यानंतर त्यांना पशुसंवर्धन मंत्री म्हणून निवडण्यात आले. त्यानंतर त्यांनी परिवहन मंत्री म्हणूनही काम केले.
सिद्धरामय्या 1994 मध्ये झाले उपमुख्यमंत्री : सिद्धरामय्या समाजाच्या सर्व घटकांमध्ये लोकप्रिय आहेत. विशेषत: मागासवर्गीयांचे नेते आहेत. 1994 च्या सार्वत्रिक निवडणुकीत ते त्याच मतदार संघातून कर्नाटक विधानसभेवर पुन्हा निवडून आले. यावेळी अर्थ आणि महसूल खात्यासह ते उपमुख्यमंत्री झाले. त्यांनी राज्याची तिजोरी भरली आणि मागील सरकारचे कर्ज फेडले. त्यांच्या कार्यकाळात राज्य पुन्हा कधीही ओव्हरड्राफ्टमध्ये गेले नाही.
जनता दलाचे अध्यक्ष : सिद्धरामय्या हे 1999 ते 2004 पर्यंत जनता दलाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. सिद्धरामय्या हे एक अग्रणी राजकारणी आहेत, त्यांच्याकडे कर्नाटकची प्रगती आणि मॉडेल राज्य म्हणून कर्नाटकचा विकास करण्यासाठी नेतृत्व गुणांसह क्षमता आहे. ऑगस्ट 2004 च्या विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले. यावेळी त्यांनी वित्त आणि उत्पादन शुल्क विभागात कर्नाटकचे उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. यावेळी त्यांनी राज्याच्या आर्थिक विकासासाठी चांगले काम केले.
जनता दलाचा राजीनामा : सिद्धरामय्या यांच्या अर्थसंकल्पाचे राज्यातील जनतेने तसेच प्रख्यात अर्थतज्ज्ञ, आणि राजकीय विचारवंतांनी कौतुक केले आहे. तीन रॅली आयोजित केल्यानंतर 2006 मध्ये त्यांनी जनता दलाचा राजिनामा दिला. त्यानंतर त्यांनी एबीपी जनता दल नावाचा नवीन पक्ष सुरू केला. या पक्षाला स्वत:चे संघटन व अस्मिता लाभली असून, जिल्हा पंचायत निवडणुकीत या पक्षाने आपली ताकद सिद्ध केली आहे.
काँग्रेसमध्ये केला प्रवेश : सिद्धरामय्या यांनी 2006 मध्ये काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन त्यांनी शेकडो अनुयायांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस पक्षात सामील झाल्यानंतर एक तत्त्वनिष्ठ राजकारणी म्हणून त्यांनी आपल्या विधानसभा मतदार संघाचा राजीनामा दिला. त्यांनी चामुंडेश्वरी विधानसभा मतदार संघातून सातत्याने निवडणुका जिंकल्या होत्या. विधानसभा मतदार संघाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पुन्हा त्याच चामुंडेश्वरी विधानसभा मतदार संघातून काँग्रेसच्या तिकिटावर पोटनिवडणूक लढवली.
हेही वाचा -