श्री क्षेत्र गाणगापूर हे कर्नाटकाच्या गुलबर्गा जिल्ह्यातील गाव आहे. अफझलपूर तालुक्यातील हे गाव दत्तात्रेयाच्या देवळासाठी प्रसिद्ध आहे. गाणगापूर भीमा नदी व अमरजा नदीच्या संगमावर वसलेले आहे. भीमा-अमरजा संगमामुळे या स्थानाला कमालीचे नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झाले आहे. भीमा-अमरजा संगमावरस्नान करून स्वयं दत्त गुरुदुपारच्या वेळेस निर्गुण मठात भिक्षेसाठी गुप्तरुपाने कोणत्याही रूपात उपस्थित असतात, अशी मान्यता आहे. नामस्मरणात तल्लीन झाल्यास व विश्र्वास ठेवला तर, देव दर्शन देतातच अशी भक्तांची श्रद्धा आहे. माघ वैद्य प्रतिपदेला श्री क्षेत्र गाणगापूर येथे सगळ्यातल मोठी यात्रा भरते. ही यात्रा प्रतिपदेपासून चतुर्थीपर्यंत असते. ह्या दिवशी श्री गुरुदेव महाराज श्रीशैल्यगमनास जातात. चतुर्थीच्या दिवशी श्रीदत्तप्रभूंची पालखी रुद्रपाद तीर्थांहून पुनश्च मठात येते.
दत्त मंदिरातील निर्गुण पादुका : मंदिराच्या आत पश्चिमी कडील बाजूस विघ्नहर्ता चिंतामणीची मूर्ती आहे. ही गणपतीची मूर्ती वालुकामय आहे. ह्या मूर्तीसमोर एक लहान दार आहे. ह्या दारातून आत गेल्यास एका गवाक्षातून त्रिमूर्तीचे दर्शन घडते. ही मूर्ती आसनस्थ आहे. ह्या मूर्तीच्या आसनावर निर्गुण पादुका आहे. ह्या तांबूस, काळसर रंगाच्या गोलाकार अश्या आहेत.
औदुंबर वृक्षाचा महिमा : भीमा-अमरजा संगमापासून वरती जाताना पवित्र औदुंबर वृक्ष आहे. ह्या वृक्षामध्ये साक्षात दत्त प्रभूंचा वास आहे असे म्हणतात. ह्या ठिकाणी गणपतीची मूर्ती व पादुका स्थापित करण्यात आल्या आहेत. हजारो भाविक ह्या औदुंबर वृक्षास प्रदक्षिणा घालून व्याधी मुक्त झालेले आहेत. भक्तांची सर्व मनोकामना पूर्ण करणारा हा औदुंबर वृक्ष आहे.
गाणगापूरच्या परिसरातील अष्टतीर्थ : षट्कुल तीर्थ, नृसिंह तीर्थ, भागीरथी तीर्थ, पापविनाशी तीर्थ, कोटी तीर्थ, रुद्रपाद तीर्थ, चक्रेश्र्वर तीर्थ व मन्मथ तीर्थ. भागीरथी तीर्थालाच ‘काशीकुंड’ असे म्हणतात. एका आख्यायिकेनुसार एका भक्ताने शंकाराची आराधना करून त्यांना प्रसन्न केले व त्या भक्ताच्या इच्छेनुसार काशीची गंगा तिथे आणली. असे म्हटले जाते कि, ह्या पाण्यात स्नान केल्याने पापे नाहीशी होतात. ह्या तीर्थात स्नान केल्याने काळमृत्यू, अल्पमृत्यू नाहीसा होऊन शतायुष प्राप्ती होते, दारिद्र्यनाश होतो, सर्व पापे नाहीशी होतात. आत्मशुद्ध होऊन मोक्षप्राप्ती होते. काशी क्षेत्रातील गंगास्नानाचे पुण्य मिळते. प्रयाग येथील त्रिवेणी संगम् नद्यांच्या स्नानाचे फळ मिळते. जन्मांचे दोष नाहीसे होतात. ज्ञान प्राप्ती होते, वंशवृद्धी होते.
श्रीक्षेत्र गाणागापूरचे दिव्य स्थळ : भस्माचा डोंगर या दिव्य स्थळाचे एक विशेष महत्व आहे. येथील पवित्र विभूतीला भक्त घरी घेऊन जातात. हा येथील मुख्य गुरुप्रसाद आहे. श्रीक्षेत्र गाणागापूरचे भस्म प्रसिद्ध आहे. येथे विश्व कल्याणासाठी ऋषी मुनींनी यज्ञ केले होते. ह्याच यज्ञातील विभूती साठवून भस्माचा डोंगर झाला. म्हणून याला भस्माचा डोंगर म्हणतात. अजूनही येथून भक्त ही विभूती घेऊन जातात. तरी पण हा डोंगर तसाच आहे.
गाणगापुरात घडलेल्या बऱ्याच लीला : श्री गुरुदेव दत्तांनी एका शेतकऱ्यावर कृपा करून त्याला अमाप धान्याची प्राप्ती करून दिली. तर एका विणकाऱ्यास एका क्षणात श्रीशैल मल्लिकार्जुनाचे दर्शन झाले. औदुंबराच्या शुष्क काष्ठास पालवी आणली तर असेच अनेक चमत्कार येथे घडलेले आहेत.